गोमांस विक्रीप्रकरणी ५ जणांना अटक
By admin | Published: August 3, 2015 01:54 AM2015-08-03T01:54:40+5:302015-08-03T01:54:40+5:30
अहमदनगर येथून पालिका आणि पोलिसांच्या नजरेसमोरून मुंबईत गोमांस आणणाऱ्या पाच जणांना विक्रोळी पोलिसांनी गजाआड केले. मोहम्मद युनूस कुरेशी
मुंबई : अहमदनगर येथून पालिका आणि पोलिसांच्या नजरेसमोरून मुंबईत गोमांस आणणाऱ्या पाच जणांना विक्रोळी पोलिसांनी गजाआड केले. मोहम्मद युनूस कुरेशी (३६), अख्तर शेख अजगर शेख (२४), खान मोहम्मद जाफर (३०), साजीद कुरेशी (३३) आणि हुसेन कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.
गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर याविरोधात डझनभर याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मात्र न्यायालयाने या कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मुभाही न्यायालयाने पोलिसांना दिली. त्यानुसार गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली.
रविवारी दुपारच्या सुमारास अहमदनगरच्या संगमनेर येथून एमएच १४ पी ७८७८ या क्वॉलिसमधून हे गोमांस कुर्ल्यात आणणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार गठाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुपारी ३च्या सुमारास मुलुंड चेकनाक्याहून गाडी पास होताच पोलिसांच्या मदतीने गाडीचा पाठलाग केला. भांडुप गाव येथील पूर्व द्रुतगती मार्गावर गाडी अडवून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये
गाय आणि वासराचे ५०० ते ६०० किलो मांस असलेली ८ पोती आढळून आली.
या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत पाच आरोपींना अटक केली. अतिशय सहजपणे मुंबईत हे मांस दाखल झाल्याने यामध्ये पालिका अधिकारी आणि पोलिसांही सहभाग असल्याचा विक्रोळी पोलिसांना संशय आहे. आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेले मांस परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विक्रोळी पोलिसांतर्फे देण्यात
आली. (प्रतिनिधी)