गुणवत्ता यादीत 5 टक्क्यांची वाढ, पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:34 AM2021-08-18T05:34:03+5:302021-08-18T05:35:22+5:30

admissions : झेवियर्स महाविद्यालयाचा कला शाखेचा कटऑफ ९८ टक्के असून मागील वर्षीपेक्षा त्यात तब्बल ६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

5 percent increase in quality list, first quality list of degree admissions | गुणवत्ता यादीत 5 टक्क्यांची वाढ, पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी

गुणवत्ता यादीत 5 टक्क्यांची वाढ, पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी

Next

मुंबई : अंतर्गत मूल्यमापनावर आधारित बारावीच्या निकालानंतर अपेक्षेप्रमाणे पदवी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत मागील वर्षीपेक्षा यंदा ४ ते ५ टक्क्यांची वाढ दिसून आली. पारंपरिक वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखांचे कटऑफ वधारले असून स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या कटऑफनेही नव्वदी पार केली आहे. वाढलेल्या निकालाच्या आधारावर गुणवत्ता यादीचा हा कटऑफ अपेक्षित असला तरी, नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाचा मार्ग खडतर असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 

झेवियर्स महाविद्यालयाचा कला शाखेचा कटऑफ ९८ टक्के असून मागील वर्षीपेक्षा त्यात तब्बल ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. या महाविद्यालयातील विज्ञान, बीएमएम, बीएमएस शाखांचे कटऑफही नव्वदीपार असल्याने दुसऱ्या गुणवत्ता यादीत हा कटऑफ ९० टक्क्यांच्या खाली येणे कठीण असल्याचे दिसून येते. तसेच हिंदुजा, डहाणूकरसारख्या महाविद्यालयांतही वाणिज्य शाखेचे कटऑफ नव्वदीपार आहेत.

पोदार महाविद्यालयातील नियमित वाणिज्य आणि बीएमएस, कला, वाणिज्य व विज्ञान तिन्ही अशा सर्वच शाखांचे कटऑफही नव्वदीपार आहेत. त्यामुळे यंदा नव्वद टक्के मिळवूनही अनेक विद्यार्थ्यांना पसंतीच्या नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.  ज्यांना पहिल्या यादीनुसार प्रवेश मिळाला आहे, त्यांना उद्यापासून प्रवेश निश्चितीसाठी अर्ज करावे लागणार असून यासाठी त्यांना २५ ऑगस्टपर्यंत वेळ आहे.

व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाकडे कल
विशेष म्हणजे पारंपरिक अभ्यासक्रमाप्रमाणे बीबीआय (बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स), बीएएफ (बॅचलर इन अकाैंटिंग अँड फायनान्स), बीएफएम (बॅचलर इन फायनान्स मार्केट) यांसारखे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांची पसंती मिळवत आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांमुळे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांच्याकडे कल वाढत आहे.  

यंदाच्या निकालाच्या आधारावर विचार करता, गुणवत्ता यादीचा वाढलेला कटऑफ अपेक्षित होता. यंदा कोणत्याही महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी स्पर्धा निश्चितच तीव्र आहे.
- अनुश्री लोकूर, उपप्राचार्या, रुईया महाविद्यालय

गुणवत्ता यादीत ४ ते ५ टक्क्यांची वाढ निश्चित झाली असली तरी, सगळ्यांना प्रवेश मिळेल याची निश्चितता विद्यार्थ्यांनी ठेवावी. प्रवेशासंदर्भात आवश्यकतेप्रमाणे तुकडीवाढ करण्याची संधी महाविद्यालयांना मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश न झाल्याने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
- तुकाराम शिवारे, अध्यक्ष, प्राचार्य संघटना

Web Title: 5 percent increase in quality list, first quality list of degree admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.