जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टाफचा डल्ला!; एचआर मॅनेजरची पोलिसात तक्रार
By गौरी टेंबकर | Published: June 5, 2024 06:29 PM2024-06-05T18:29:37+5:302024-06-05T18:30:35+5:30
जुहु पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई: जुहूतील पंचतारांकित हॉटेल नोवोटेल मध्ये लाखो रुपयांचा डल्ला स्टाफनेच मारण्याचा प्रकार उघडकीस आला.याविरोधात एच आर मॅनेजरने जुहु पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पूजा नारकर (३५) या जुहू येथील नोवोटेल हॉटेल कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्सेस मॅनेजर या पदावर काम करतात. त्यानुसार हॉटेलमधील सर्व स्टाफवर प्रत्यक्ष देखरेख आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या हॉटेलमध्ये गेस्ट सर्विस असोसिएट म्हणून दक्षता कोळी, संकेत शिंदे, डरेन कटवार, तर फूड अँड बेवरेजेस टीम लीडर म्हणून मनन घटेलिया, अमन चव्हाण, निखिल राडे हे काम करतात. नारकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या दिड वर्षापासून या ठिकाणी काम करणाऱ्या दक्षताकडे हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना अटेंड करत हॉटेलच्या सेवांबाबत माहिती देणे. तसेच बेकरी आणि अन्य खाद्यपदार्थांची त्यांना विक्री करणे ही जबाबदारी आहे. मात्र २१ मे रोजी तिच्याजवळ असलेली रोख रक्कम ही कॅश काऊंटर मध्ये न ठेवता ड्रॉवरच्या जागी असलेल्या मोकळ्या जागेत तिने ठेवली. ती बाब नारकर यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पडताळले तेव्हा दक्षता ही हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यानी दिलेले पैसे कॅशकाऊंटरमध्ये न ठेवता ड्रॉवरच्या खालीच ठेवायची. तसेच घरी जाताना खिशात घालून ते घेऊन जायची असे दिसले. इतकेच नव्हे तर ऑनलाईन पेमेंटच्या वेळीही हॉटेलचा यूपीआय आयडी न देता स्वतःचा यूपीआय आयडी देत पैसे स्वीकारायची. ही बाब वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी नारकर यांना अन्य कर्मचाऱ्यांचीही चौकशी करायला सांगितली. त्यानुसार अन्य पाच कर्मचारी देखील अशाच प्रकारे पैसे स्वीकारत असल्याचे उघड झाले. या सहा जणांनी अशाप्रकारे हॉटेलला अद्याप १ लाख ६० हजार रुपयांचा चुना लावत हे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. या आरोपाखाली जुहू पोलिसांनी सहा जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४, ४०८ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.