५ हजार ५७५ कोटी ‘मालमत्ते’पोटी वसूल! महापालिकेच्या खिशात ७७५ कोटी अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 07:58 AM2023-04-10T07:58:57+5:302023-04-10T07:59:18+5:30
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची पालिका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये इतकी वसुली केली आहे.
मुंबई :
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची पालिका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये इतकी वसुली केली आहे. निर्धारित लक्ष्य ४ हजार ८०० कोटींच्या तुलनेत यंदा तब्बल ७७५ कोटी रुपये अधिक कर वसूल करण्यात कर निर्धारण व संकलन विभागास यश आले आहे.
५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सूट
मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी हा निर्णय घेण्यात आला. एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे.
कर प्रणाली बंद
पालिकेच्या मालमत्ता कराची संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्याचे काम ३ ते १० फेब्रुवारीदरम्यान हाती घेण्यात आले. त्यामुळे मालमत्ता करप्रणाली कामकाजासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्याकाळात करदात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.
१६ टक्क्यांनी वसुली जास्त
महापालिका मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा पुरविते. या अनुषंगाने ‘मालमत्ता कर’ हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. हा मालमत्ता कर नागरिकांनी वेळेत जमा करावा, यासाठी पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने वर्षभर सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे ३१ मार्च रोजी संपलेल्या २०२२ -२०२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये इतकी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वसुली १६ टक्क्यांनी जास्त आहे.
प्रकरणे प्रलंबित
नव्या कर रचनेला काही जणांनी विरोध दर्शविला असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने आणखी कर वसुली होऊ शकलेली नाही, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.