Join us

आगीच्या ५ हजार घटना, अग्निशमन केंद्रे फक्त ५१, मुंबईत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची शर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:42 IST

Mumbai Fire News: मुंबई शहरात दरवर्षी सरासरी आगीच्या ५००० घटना घडत असून, त्या विझविण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारित एकूण ५१ अग्निशमन केंद्रे आहेत. एकूण लोकसंख्या आणि लागणाऱ्या आगींच्या तुलनेत अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ कमी असले तरी दलाचे जवान शर्थीने काम करतात.

 मुंबईमुंबई शहरात दरवर्षी सरासरी आगीच्या ५००० घटना घडत असून, त्या विझविण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारित एकूण ५१ अग्निशमन केंद्रे आहेत. एकूण लोकसंख्या आणि लागणाऱ्या आगींच्या तुलनेत अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ कमी असले तरी दलाचे जवान शर्थीने काम करतात. त्यात नागरिकांच्या दुर्लक्ष आगीस कारणीभूत होत असल्याने सर्वांनी लक्ष दिल्यास अशा दुर्घटना टाळणे शक्य आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेच्या अखत्यारित मुंबईत ३४ मोठी अग्निशमन केंद्रे, तर १७ छोटी अग्निशमन केंद्रे आहेत. या अग्निशमन केंद्रांचे नियंत्रण कक्ष भायखळा येथे आहे. सध्या कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रुज, चेंबूर, अंधेरी आणि सागरी किनारा मार्गालगत नवीन केंद्रे बांधण्यात येत आहेत.  मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि उंच इमारतीमुळे अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवण्याची निश्चितच गरज आहे तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असून याबाबत आयुक्त स्तरावरून कार्यवाही सुरू असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले.

जुन्या विद्युत केबल बदला!उन्हाळ्यात आगीचे प्रमाण सातत्याने वाढतात. जुन्या कमी व्होल्टेजच्या केबल्स उन्हाळ्यात विजेचा ताण वाढल्याने ठिणगी लागून पेट घेतात. अशा केबल्स योग्यवेळी बदलल्या नाही तर निश्चितच आगीच्या दुर्घटना वाढतात. अशा केबल्स तत्काळ बदलणे आवश्यक आहे. 

अग्नी सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्षमुंबई शहरात दरवर्षी सरासरी आगीच्या ५००० घटना नोंदवल्या जातात; मात्र मुंबई अग्निशमन दलामार्फत या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिशय परिणामकारकतेने काम केले जाते. कमीत कमी वित्तहानी व्हावी आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी जवान प्रयत्न करीत असतात; मात्र अलीकडे मुंबईत असलेल्या उंच इमारतीमुळे कित्येकदा आगीच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो. नव्या इमारतीमध्ये फायर आणि इलेक्ट्रिकल लिफ्ट बांधण्यात आलेली नसते. त्यातही जेथे या लिफ्टची तजवीज असेल, तेथे ती कित्येकदा बंद असते. त्यामुळे आमच्या जवानांना पायी जिने चढत जाऊन घटनास्थळी पोहोचावे लागते. त्यातच त्यांची दमछाक होऊन कामात अडथळा येतो. या कारणामुळे नागरिकांची सुटकाही वेळेत करणे अडचणीचे होते.

 

टॅग्स :मुंबईअग्निशमन दल