राज्यात अडकलेले ५ पर्यटक मायदेशी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:34 PM2020-04-14T18:34:02+5:302020-04-14T18:34:39+5:30
देशात लॉकडाऊन घोषित झाल्याने या काळात राज्यात अडकलेल्या परदेशी पर्यटकांसाठी पर्यटन विभाग मदतीसाठी धावून आला आहे.
उर्वरित पर्यटकांना निवास, भोजनासाठी मदत
मुंबई : देशात लॉकडाऊन घोषित झाल्याने या काळात राज्यात अडकलेल्या परदेशी पर्यटकांसाठी पर्यटन विभाग मदतीसाठी धावून आला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्याना मदतीचा हात देत त्यांना योग्य सुविधा पुरवत, सुरक्षित ठिकाणी आणि काहीना त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आतापर्यटन 5 परदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले असून 65 परदेशी पर्यटकांना योग्य मार्गदर्शन करीत त्यांची संपूर्ण जबाबदारी पर्यटन संचालनालयाने घेतली आहे.
लॉकडाऊन घोषित होण्याच्या आधीपासून अमेरिका, कोलोम्बिया, फ्रान्स, जर्मनी आणि अन्य विविध देशातील साधारण 70 पर्यटक विविध भागात होते. लॉकडाऊननंतर आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्याने सर्वजण अडचणीत सापडले. राज्याचे पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यटन संचालनालयाने परदेशी पर्यटकांना सर्व तऱ्हेची मदत करण्यासाठी नियोजन केले.
संचालनालयात एक विशेष कक्ष स्थापन केला असून त्या माध्यमातून विदेश मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, नागरी उड्डयन मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून त्या त्या देशांच्या दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे. ज्या देशांनी विशेष विमानांची सोय केली त्या देशातील पर्यटकांना ते ज्या भागात अडकले तेथील पर्यटन उपसंचालकांच्या माध्यमातून मुंबईत सुरक्षितरित्या आणण्यात आले. राज्यात जिल्हाबंदी असतांना पर्यटन संचालनालयाने त्यांच्या उपसंचालकांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक मान्यता घेऊन परदेशी पर्यटकांना मुंबईपर्यंत सुखरूप आणले. काही देशांनी मुंबईत त्यांचे विमान पाठवून त्यांच्या नागरिकांना घेऊन जाण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 5 परदेशी नागरिक त्यांच्या देशात सुखरूप पोहचले आहेत.
-------------------------------------
नागपूर येथे पेंच जंगलात पर्यटनासाठी आलेल्या मायकल स्टप्लझिंग आणि अलेक्झांड्रा सिमोनी या जर्मन दांपत्यास मुंबईत आणण्यात आले. त्यांना27 मार्चला मायदेशी पाठविले. फ्रान्सचे क्रिस्टीन रोलँड हे औरंगाबादला पर्यटनासाठी आले होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना 3 एप्रिलला मायदेशात पाठविले. सांगलीमध्ये आलेल्या अमेरिकेतील अकबर बिमजी आणि त्यांची पत्नी यांना मुंबईत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत पर्यटन संचालनालयाने केली. त्यांच्या दुतावासाशी संपर्क साधून 3 एप्रिलला मायदेशी रवाना केले. तसेच इंदोर (मध्य प्रदेश) आणि भंडारा येथील २ परदेशी पर्यटकांनाही मंगळवारी मुंबईत आणण्यात येत असून ते लवकरच मायदेशी परतत आहेत.
---------------------------------------
अडचणीत सापडलेल्या परदेशी पर्यटकांच्या निवास आणि भोजनाची सोय
वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आलेल्या मालवी देशातील नेडसन गणाला हे लॉकडाऊनमुळे अडचणीत आले होते. त्यांच्याकडील सर्व पैसे संपल्याने त्यांना राहण्याची आणि जेवणाचीही अडचण निर्माण झाली होती. पर्यटन संचालनालयाने बृहन्मुंबई महापालिकेशी संपर्क साधून या पर्यटकाची जेवणाची व्यवस्था केली आहे. शिवाय ते राहत असलेल्या हॉटेल मालकाला हॉटेल असोसिएशनशी संपर्क साधून या पर्यटकाकडून हॉटेल भाडे न घेण्याबाबत सहकार्य केले. कोलोम्बिया देशाचे 3 नागरिक असलेल्या पर्यटकांचीही हीच अडचण असल्याने त्यांची राहण्याची व जेवणाची सुविधा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केली असून या पर्यटकांच्या देशांच्या दुतावासाशी संपर्क साधला आहे. लवकरच त्यांना त्यांच्या देशात पाठविण्यात येणार आहे. युकेमधील बहुतांश पर्यटक राज्यातील विविध भागातून एकत्रित करून त्यांना मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांचे विमान लवकरच मुंबईत दाखल होणार असून त्यांना परत पाठविण्यासाठी सर्व प्रक्रीया पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून केली जात आहे.