Join us

चिंताजनक! जीटी, कामा, सायन आणि केईएममधील ५०% व्हेंटिलेटर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:25 AM

माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव उघड

मुंबई : शहर, उपनगरात पावसाचा जोर कमी झाला असला, तरीही साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे पालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात अजूनही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. दिवसागणिक या रुग्णालयांवर रुग्णसेवेचा बोजा वाढत असला, तरीही जीटी, कामा, वांद्रे नागरी स्वास्थ्य केंद्र, सायन व केईएम अशा महत्त्वाच्या रुग्णालयांतील ५० टक्के व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. परिणामी, यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.मुंबईसारख्या शहरात आरोग्यसेवेची स्थिती चिंताजनक असून, आता शहर उपनगरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर्स बंद स्थितीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यात केईएम रुग्णालयातील ३२ व्हेंटिलेटर्स बंद आहेत, तर सायन रुग्णालयात चार व्हेंटिलेटर्सची सेवा बंद आहे. याप्रमाणेच सर जे.जे. समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या वांद्रे नागरी स्वास्थ्य केंद्रातही दोन व्हेंटिलेटर्स २०१४ सालापासून बंद आहेत, तर गोकूळदास तेजपाल रुग्णालयात १२ पैकी चार व्हेंटिलेटर्स बंद आहेत. त्याचप्रमाणे, कामा रुग्णालयातही चार व्हेंटिलेटर्सपैकी एक बंद असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.रुग्णालयांमध्ये बऱ्याचदा व्हेंटिलेटरला पर्याय म्हणून अ‍ॅम्ब्यू पंपची सेवा देण्यात येते. मात्र, गेल्या आठवड्यात सायन रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने अ‍ॅम्ब्यू पंप वापरूनही एका रुग्णाचा मृत्यू ओढावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता.

टॅग्स :केईएम रुग्णालय