मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वांद्रे पश्चिम येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कार्यालयामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.समृद्धी महामार्गाचे काम आत्तापर्यंत २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता तयार होणार आहे. या प्रकल्पाच्या कामामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळेमध्ये जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. यासंबंधित जमिनीच्या मालकांना योग्य तो मोबदलाही देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वत: पुढे येऊन लोकांनी पुढाकार घेतला, असे पहिल्यांदाच झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टीक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारली जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८३११ हेक्टर जमीनही संपादित करण्यात आली आहे. या कामासाठी विविध विभागांची आवश्यक असलेली परवानगी घेण्यात आली असून याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला येण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासांच्या निम्मा वेळ म्हणजेच ७ तासांमध्ये मुंबई गाठता येणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यासह मुंबई-पुणे क्षमता विस्तार या मार्गिकेचेही काम सुरू असून येत्या एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. तर वर्सोवा-वरळी सीलिंक प्रकल्पाच्या कारशेडला विरोध होत असल्याने हे काम धिम्या गतीने सुरू असून कारशेडचा प्रश्न सुटताच हा प्रकल्पही पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.>३५६ गावांतूनजाणार महामार्गंमुंबई ते नागपूर अशा ७०० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या कामाला आता गती आली आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावांतून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. सध्या मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी साधारणत: सोळा तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.
समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण; एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 6:31 AM