Join us

मुकेश अंबानी विरोधात म्हणजेच मोदींची सत्ता जात असल्याचा संदेश - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 9:10 PM

'नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षात फक्त खोट्या जाहिराती केल्या'

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी आज सभा घेतली. या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. 

उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन करणे म्हणजेच मोदींची सत्ता जात आहे.  मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाच संदेश आहे. आजपर्यंत एखाद्या उद्योगपतीने जाहीरपणे कोण्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे मला तरी आठवत नाही, असेही राज ठाकरे  यांनी सांगितले. 

भाजपाशी संबंधित फेसबुक पेजवरील 'मोदी है तो मुमकीन है' जाहिरातीतील एक कुटुंब राज ठाकरे यांनी आपल्या व्यासपीठावर आणून भाजपाच्या आयटी सेलने फेसबुकवर खोट्या जाहिराती केल्या असा आरोप केला. नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षात फक्त खोट्या जाहिराती केल्या. नरेंद्र मोदी एवढे खोटे बोलले आहेत की याला तोडं कसे द्यायचे हे भाजपाच्या लोकांनाच कळत नाहीत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

याचबरोबर, नरेंद्र मोदी शरद पवारांचे बोट धरुन मी सगळं शिकलो, असे सांगतात आणि आम्हाला नावं ठेवतात. 2014 ची लहर आता राहिली नाही, हे त्यांनी कळलं आहे, म्हणून ते काहीही बोलत आहेत, अशी टीकाही नरेंद्र मोदींवर केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे केले नाही, ते नरेंद्र मोदींनी केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नरेंद्र मोदी हेच का पंतप्रधान हवेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना थोडी झोप लागू द्यावी म्हणून दोन दिवस गॅप घेतला होता असे सांगत मुख्यमंत्री उत्तर देण्यास भांबावले आहेत, त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तर नाहीत म्हणून माझ्यावर आरोप करत आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 2014 मध्ये काँग्रेसवर टीका केली आहे. कारण, यापूर्वी ते सरकारमध्ये होते म्हणून त्यांचे वाभाडे काढले. आता तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुमचे कपडे उतरविले, अशी टीका भाजपावर राज ठाकरे यांनी केली. 

पुलवामामध्ये जी दुर्दैवी घटना घडली, त्याची पूर्वसूचना दिली होती, आरडीएक्सचा धोका आहे हे माहीत असून देखील का नाही पुरेशी काळजी घेतली गेली? इतकी भीषण घटना घडल्यावर सुद्धा मोदी रंगबेरंगी कपडे घालून फिरत होते. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर तसूभर दुःख नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केली. 

राफेलचे काम अनिल अंबानीला का दिले गेले? एचएएल ह्या भारतीय सरकारी कंपनीला डावलून तुम्ही अनिल अंबानीला का काम दिले? आणि आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत? आणि हेच देशद्रोहाची आणि देशप्रेमाची सर्टिफिकेट वाटणार? मग शरीफना केक तुम्ही केक भरवता मग तुम्ही देशद्रोही नाही का? असे सवालही राज ठाकरे यांनी केले. 

मोदींच्या काळात बलात्कारांची संख्या वाढली. २०१६ मध्ये ३८००० बलात्काराच्या घटना झाल्या. २०१७ ते २०१९ ह्या काळात बलात्काराचे अथवा अन्य गुन्ह्यांचे आकडे देणारा एनसीआरबीचा रिपोर्ट ह्यांनी बाहेरच येऊन दिला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 

मोदी आणि अमित शाह ह्यांच्याविरोधात जो बोलेल त्यांच्यावर इडीच्या केसेस टाकल्या जातात. मोदी आणि शाह ह्यांनी विसरू नये की तुम्ही देखील विरोधात जाणार आणि तुमच्यावर केसेस पडणार. आणि मी पुन्हा सांगतो की नोटबंदी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेमुंबईमुंबई दक्षिणमनसेलोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019