पालिका प्रशासनाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांच्या निदानासाठी डिसेंबर महिन्यात पालिका प्रशासन अँटिजन चाचण्यांवर अधिक अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर महिन्यात करण्यात आलेल्या ४.४८ लाख कोरोना चाचण्यांपैकी २.२१ लाख अँटिजन चाचण्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यात ३.७१ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात १.६८ लाख अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. तर सप्टेंबर महिन्यात ३.५१ लाख कोरोना चाचण्यांपैकी १.०९ अँटिजन चाचण्या होत्या. यावरून आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण मागील काही महिन्यांत कमी झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण ६९ टक्के होते, ऑक्टोबर महिन्यात ६० टक्के तर नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण कमी होऊन थेट ५५ टक्क्यांवर आले होते.
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १०० व्यक्तींमागे पॉझिटिव्हिटी दर १० ते १२ टक्के आहे, हे प्रमाण अँटिजन चाचण्यांमध्ये ३ ते ४ टक्के इतके आहे. दर दिवसाला मुंबईत १२ ते १९ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. पालिका प्रशासनाच्या वतीने दर दिवशी १५ हजार आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. याखेरीज, पॉझिटिव्हिटी दरावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊन अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत.
याविषयी डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, अँटिजन चाचण्यांचा वापर वाढला आहे यात काही चूक नाही; मात्र अचूक निदानासाठी आरटीपीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. शहर - उपनगरातील अनलॉकचा फेझ वाढत असून त्यामुळे विक्रेते, फेरीवाले आणि दुकानदार यांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. त्यासाठी अँटिजन चाचण्या फायदेशीर ठरतात. त्यांचे अहवाल लवकर मिळतात. मात्र भविष्यात आरटीपीसीआरबाबत अत्याधुनिकता आणून त्यांचे अहवाल लवकर मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.