Join us

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे ५० टक्के मूल्यमापन शाळास्तरावर व्हावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:07 AM

राज्य शिक्षक परिषद; काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निम्मा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील ...

राज्य शिक्षक परिषद; काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निम्मा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. मात्र, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च, एप्रिलमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, या परीक्षा या ऑफलाइनच होणार असल्याचे जाहीर केले. काेराेना संसर्ग वाढत असल्याने ऑफलाइन परीक्षा घेणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालकांच्या दृष्टीनेही घातक ठरू शकते. त्यामुळे शिक्षण विभागाने सर्वंकष विचार करून अभ्यासक्रमात एकूण ५० टक्के कपातीची घोषणा करावी व उरलेले ५० टक्के मूल्यमापन शाळा स्तरावर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात अनेक विद्यार्थी व दुर्बल घटक अभ्यासापासून वंचित राहिले आहेत. ते दहावी, बारावीची परीक्षा अभ्यास पूर्ण झालेला नसताना कशी देऊ शकतील? असा प्रश्न राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला. शालेय स्तरावरून मूल्यमापनाच्या सूचना शाळांना दिल्यास विद्यार्थ्यांना आलेले बोर्डाच्या परीक्षांचे दडपण कमी होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले.

मुंबईतील शाळा सुरू नसताना येथील शिक्षकांना सद्य:स्थितीत एक दिवसाआड शाळेत बोलावले जात आहे. ५० टक्के उपस्थितीच्या नियमामुळे फक्त हजेरी लावण्यासाठी शिक्षकांना शाळेत बोलावण्याची सक्ती केली जात असून, कोरोनाबाधित क्षेत्रांतही हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण विभागाने पुन्हा एकदा सुधारित सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सद्य:स्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय न घेता नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांना लस देऊनच शाळा सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.