Join us

पोलीस कार्यालयात कर्मचाऱ्यांची ५० टक्के हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:06 AM

महासंचालकांचे आदेश : वर्क फ्रॉम होमची सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे पोलीस मुख्यालयासह राज्यभरातील ...

महासंचालकांचे आदेश : वर्क फ्रॉम होमची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे पोलीस मुख्यालयासह राज्यभरातील कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर ही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार ५० टक्के हजेरी ठेवून उर्वरित कर्मचाऱ्यांना घरातून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार त्यांच्या कामकाजाची रचना करण्याची सूचना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी घटक प्रमुखांना केली आहे.

राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वच स्तरावरून त्याबाबत दक्षता घेतली जात आहे. पोलिसांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही उपस्थित राहण्याबाबत शिथिलता देण्यात आली आहे. मुख्यालयातील अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) संजीव कुमार सिंघल यांनी त्याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये गट अ आणि ब श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या १०० टक्के राहतील. तर गट क आणि ड श्रेणीतील पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या ५० टक्के राहील. यापैकी २५ टक्के कर्मचारी सकाळी ९ ते ४ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहतील. उर्वरित २५ टक्के कर्मचारी सकाळी ११ ते ५ या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील. कोणी कोणत्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहायचे, याबाबतचा निर्णय संबंधित उप सहाय्यक घेतील. तर गट क आणि ड श्रेणीतील इतर ५० टक्के पोलीस कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करतील. पण ज्यावेळी कार्यालयात तातडीची आवश्यकता असेल त्यावेळी तात्कालीन परिस्थितीनुसार संबंधित उप सहाय्यक जास्त कर्मचाऱ्यांना (गट क आणि ड श्रेणी) कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी बोलवू शकतात. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत या पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.