मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आमदार व खासदारांची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच भाजपच्या 122 आमदारांना बंद पाकिटात त्यांची गुणपत्रिका दाखवली. त्यामध्ये 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक असल्याचे उघड झाले आहे. एका खासगी कंपनीने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार मतदारसंघातील आमदार-खासदारांना रेटिंग/गुण देण्यात आले. त्यामध्ये भाजपचे जवळपास 50 आमदार डेंजर झोनमध्ये आहेत. तर राज्यातील 6 भाजप खासदार या परीक्षेत नापास झाले आहेत.
भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक मंगळवारी सायंकाळी झाली. तीन तासांच्या बैठकीत सुरुवातीलाच प्रत्येक आमदाराच्या हातात दोन पाकिटे देण्यात आली. हिरव्या रंगाच्या पाकिटात राज्य सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामगिरीचे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती होती. दुसऱ्या खाकी पाकिटात काय आहे, याची उत्सुकता ताणली गेली. आमदारांनी ते उघडताच त्यातील अहवाल बघून अनेक जण जमिनीवर आले त्यात मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागण्याची अपेक्षा असलेल्या काही जणांचाही समावेश होता. त्यांचे चेहरे पडले तर काहींचे फुलले. त्यामुळे उर्वरित दिवसांत उत्कृष्ट काम केलं, तर आमदारांना तिकीट मिळणार आहे. अन्यथा, या आमदारांची हकालपट्टी होऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
तसेच या सर्वेक्षणानुसार राज्यातील भाजपच्या 21 खासदारांपैकी सहा खासदांची तिकिटे 2019 मध्ये कापली जाऊ शकतात. त्यामध्ये रक्षा खडसे, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे या दिग्गज नेत्यांचीही नावे असल्याचे समजते. दरम्यान, भाजपाच्या आमदारांबद्दल जनतेच्या भावना काय आहेत कोणत्या मतदारसंघात जनतेची पहिली पसंती आज कोणत्या पक्षाचा कोणता नेता आहे, कोणत्या मतदारसंघात आमदाराची लोकप्रियता कशी आणि किती आहे हे अहवालात नमूद होते. आजच्या परिस्थितीत मतदारसंघांमध्ये कोणकोणते समाज भाजपाच्या बाजूने आहेत, कोणते विरोधात जाऊ शकतात आमदारांबद्दल नेमकी नाराजी काय आहे आमदाराच्या कुठल्या कामांवर मतदार खुश आहेत, याचीही माहिती सर्वेक्षणात देण्यात आली आहे.