Join us

'५० खोके, नागालँड ओके'; राष्ट्रवादीचे सत्तेचे प्रयोग म्हणत मनसेचे शाब्दिक टोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 9:08 AM

नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली

मुंबई - भाजपला तीन राज्यांच्या निवडणुकीत चागंलं यश मिळालं. त्यापैकी, नागालँडच्या निकालात NDPP आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील २ पक्षांनीही जागा पटकावल्या. त्यात रामदास आठवलेंच्या आरपीआयने २ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरला. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यावरुनच मनसेनंराष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केलीय.  

नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बैठकीत नागालँड सरकारला पाठिंबा देणार असल्यावर राष्ट्रवादीचं शिक्कामोर्तब झालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत होती. त्यामुळे शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही, राष्ट्रवादीवर विरोधकांकडून टीका होतेय. मनसेचे नेते गजानन काळे यांनी व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादीवर जबरी टीका केलीय. हे राष्ट्रवादीचे सत्तेचे प्रयोग असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सरकार बनविण्यासाठी पाठिंबा दिलाय म्हणे, पवारसाहेब है तो मुमकीन है. आता भारतीय जनता पक्षाची ढ, ब का ड टीम राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावं का, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला पवारसाहेबांचा पाठिंबा होता, ह्या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर शिक्कामोर्तब झालय का, असे सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी विचारले आहेत. तसेच, आता, एक नवीन पान-सुपारी सम्राट कोण हे महाराष्ट्राने ओळखावं अशी टाकाही काळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलीय. 

नागालँडमध्ये भाजपला आमचा पाठिंबा नाही 

आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता त्याचसोबत राष्ट्रवादी आणि रिओ यांचे जुने संबंध पाहता या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले असून एकही पक्ष विरोधात बसायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी सांगितले.  

टॅग्स :मनसेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारभाजपा