Join us

मुंबईत कोरोनाच्या चाचणीत ५० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:03 AM

मागील दहा दिवसांपासून प्रमाण वाढवले : संसर्ग पसरण्याच्या ठिकाणांवर लक्षलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ...

मागील दहा दिवसांपासून प्रमाण वाढवले : संसर्ग पसरण्याच्या ठिकाणांवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरात मागील १० दिवसांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढविले आहे. य़ाशिवाय, रेल्वेस्थानक, विमानतळ अशा संसर्ग पसरवणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून येथेही चाचण्या घेण्यात येत आहेत.

मुंबईत २५ नोव्हेंबर रोजी एका दिवसात सर्वाधिक म्हणजेच १९ हजार १८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात १० हजार ५०० अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. तर अन्य चाचण्या या आरटीपीसीआर होत्या. आतापर्यंत मुंबईत कोरोनाच्या १९ लाख १५ हजार ३४२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात एका दिवशी सर्वाधिक म्हणजेच १६ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या असून, सर्वात कमी चाचण्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आल्या हाेत्या. १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाण दिवसाला ४ हजार चाचण्या इतके हाेते.

अँटिजन चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण ६ ते ८ टक्के असून आरटीपीसीआर चाचण्यांत हे प्रमाण १० ते १२ टक्के आहे. अँटिजन चाचणी निगेटिव्ह आल्यास आणि एखाद्या व्यक्तीस लक्षणे किंवा अतिजोखमीचे आजार असल्यास त्याची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

* येत्या काही दिवसांत प्रमाण आणखी वाढवणार

२७ नोव्हेंबर रोजी दिवसभरात १६ हजार ९०२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. २८ नोव्हेंबर रोजी १७ हजार ९७३ चाचण्या करण्यात आल्या. पालिका प्रशासनाने अँटिजन चाचण्यांच्या क्षमतेत कमालीची वाढ केली आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण आणखी वाढवणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

-----------------------