Join us  

आरटीओ संपामुळे ५० कोटींचा फटका; लायसन्सचे काम ठप्प, नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 7:11 AM

संपावर गेलेल्या आरटीओ कर्मचाऱ्यांमुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

मुंबई : आरटीओ कार्यालय, जकात नाका, चेकपोस्ट येथे अतिरिक्त मनुष्यबळ मिळण्यासाठी आकृतिबंधाची सुयोग्य अंमलबजावणी, महसूल विभागानुसार होणाऱ्या बदल्या अशा प्रमुख मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आरटीओ कर्मचाऱ्यांमुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याने एकही कच्चे आणि पक्के लायसन्सचे वितरण आणि वाहन नोंदणी झाली नाही. याचा फटका विविध कामांसाठी आरटीओमध्ये नागरिकांना बसला असून, त्यांचे प्रचंड हाल झाले. तसेच कामकाज ठप्प झाल्याने परिवहन विभागाचे सुमारे ५० कोटींचे नुकसानदेखील झाले. 

मोटार वाहन (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी संपाचा मंगळवारी पहिला दिवस होता. मागण्या पूर्ण होईपर्यंत तो बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संपामध्ये राज्यभरातील सुमारे १५०० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यातील ५५ आरटीओ आणि २५ चेकपोस्टवरील कामकाज ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांचा संप आणखी काही दिवस असाच सुरू राहिल्यास राज्यातील परिवहन विभागाच्या महसुलावर मोठा परिणाम होणार असून, नागरिकांचे ही मोठ्या प्रमाणात हाल सुरूच राहणार आहेत. 

परिवहन आयुक्तांशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नसल्याने राज्यभरातील मोटार वाहन कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपावर  जाण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :आरटीओ ऑफीसमुंबईसंप