५० कोटी खर्चूनही रस्ते खड्ड्यातच !

By admin | Published: July 24, 2016 05:23 AM2016-07-24T05:23:43+5:302016-07-24T05:23:43+5:30

विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील तीन रस्त्यांवर तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करूनही हे रस्ते खड्ड्यात गेल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या तिन्ही रस्त्यांवर

50 crore worth of roads in the potholes! | ५० कोटी खर्चूनही रस्ते खड्ड्यातच !

५० कोटी खर्चूनही रस्ते खड्ड्यातच !

Next

- मनीषा म्हात्रे, मुंबई

विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील तीन रस्त्यांवर तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करूनही हे रस्ते खड्ड्यात गेल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या तिन्ही रस्त्यांवर ५० हून अधिक खड्डे पडले असून, हे तिन्ही रस्ते समतल नसल्याने वाहनचालकांसह नागरिकांसाठी ते डोकेदुखी ठरू लागले आहेत. पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटूनहीपालिका गंभीर नसल्याने हा प्रश्न मार्गी कधी लागणार असा रोखठोक सवाल आता विक्रोळीकरांनी केला आहे.
विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक २१९ ते २४४, २३२ ते १७३, २३६ ते २३९ या रस्त्यांचे २०१३ ते २०१५ सालादरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात आले. या तिन्ही रस्त्यांवर ५० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. या परिसरात विकास कॉलेज, महापालिकेचे महात्मा फुले रुग्णालय तसेच उद्यान आहे. त्यामुळे तिन्ही रस्त्यांवर कायम वर्दळ असते.

दोन रस्त्यांचा खर्च ३६ कोटी ३५ लाख
रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चरकडून या रस्त्यांचे काम २०१३ ते १५ दरम्यान करण्यात आले होते. मात्र, या रस्त्यांपैकी २३२ ते १७३ या इमारतीलगतच्या रस्त्यांसाठी २६ कोटी ५४ लाख तर २३६ ते २३९ या इमारतीलगतच्या रस्त्यांवर ८ कोटी ८१ लाख खर्च करण्यात आले. म्हणजे या दोन रस्त्यांवर एकूण ३६ कोटी ३५ लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र, विक्रोळीकर आता हे कोट्यवधींचे रस्ते गेले कुठे? असा सवाल करत आहेत.

नगरसेविका उपलब्ध नाही...
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नगरसेविका प्रियांका शृंगारे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

डांबरीकरण केलेल्या या रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील भाग खचत आहे. त्यामुळे रस्ता समतल राहिलेला नाही. याचा त्रास वाहनचालकांना अधिक होत असून, रस्त्यांवर पडलेल्या काही खड्ड्यांची लांबी-रुंदी अनुक्रमे अडीच फूट एवढी आहे. इमारत क्रमांक २०१९ ते २३२ या दरम्यानच्या रस्त्यांवरही पडलेले खड्डे तापदायक ठरत असून, स्थानिक लोकप्रतिनिधीने याकडे दुर्लक्ष केले आहे.
विशेष बाब म्हणजे, याच परिसरात स्थानिक नगरसेविका प्रियांका शृंगारे वास्तव्यास आहे आणि त्या जिथे राहतात, त्याच इमारतीलगतच्या रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याने, स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कंत्राटदार ‘स्विच आॅफ’ : रेलकॉन कंपनीकडे या रस्त्यांचे कंत्राट देण्यात आले होते. याबाबत कंत्राटदार तेजस शहा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल सातत्याने स्विच आॅफ येत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सर्कलला येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतो. रस्ता एकसमान नसल्याने याचा फटका आम्हाला बसतो. याबाबत कुणाला सांगूनही काही उपयोग नाही.
- अरविंदे झेंडे, रहिवासी

दोन वर्षांपूर्वी येथील रस्त्याचे काम झाले. मात्र, कामाचे सोंग आणून ठेकेदाराने हात वर केले. लोकप्रतिनिधी, तसेच स्थानिक रहिवासीही ठेकेदारांकडे बोट दाखवतात. स्थानिक नगरसेविकाही याच ठिकाणी राहते. आम्ही तर सामान्य आहोत.
- संदीप केंगार, रहिवासी

या रस्त्यासाठी प्रशासन मलमपट्टी करत आमची फसवणूक करते. त्यामुळे संबंधितांवर ठोस कारवाई केल्यास, यातून काहीतरी मार्ग निघण्यास मदत होईल.
- दयानंद चौधरी, रहिवासी,
ज्येष्ठ नागरिक

रस्त्यांवरील चढउतारामुळे अपघात होत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे. संबधित यंत्रणेला याचे काही सोयरसुतक नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांचा आम्हाला अतोनात त्रास होत असून, भ्रष्टाचारामुळे येथील रस्ते खड्ड्यांत गेले आहेत.
- अमित रोकडे, रहिवासी

Web Title: 50 crore worth of roads in the potholes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.