५० शाेधनिबंधांची आयआयटीतच चाेरी, प्राध्यापक आणि संस्थेवर प्रश्नचिन्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:12 AM2023-11-07T06:12:57+5:302023-11-07T06:17:32+5:30

अमेरिकेच्या स्टॅन्फर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष मार्क टेसिअर यांच्या राजीनाम्यानंतर हा प्रकार प्रकाशात आला.

50 dissertations question IITs, professors and institutes | ५० शाेधनिबंधांची आयआयटीतच चाेरी, प्राध्यापक आणि संस्थेवर प्रश्नचिन्ह!

५० शाेधनिबंधांची आयआयटीतच चाेरी, प्राध्यापक आणि संस्थेवर प्रश्नचिन्ह!

- रेश्मा शिवडेकर

मुंबई : देशविदेशात भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे (आयआयटी) नाव आदराने घेतले जाते. मात्र, आयआयटीच्या नावाला बट्टा लागेल असा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाङ्मयचौर्याच्या आरोपांवरून सुमारे ५० हून अधिक रिसर्च पेपर (शोध निबंध) मागे घेण्याची नामुष्की आयआयटीवर ओढवली आहे. शोध निबंधांच्या लेखकांवर काय कारवाई झाली याबाबत स्पष्टता नसली तरी यामुळे आयआयटीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ऐरणीवर 
आला आहे.

देशातील विविध आयआयटींनी २००६ ते २०२३ या काळात ५८ रिसर्च पेपर मागे घेतल्याचे ‘इंडिया रिसर्च वॉचडॉग’ या संस्थेने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. निबंध अथवा मजकुराची चोरी, निबंधांची नक्कल या कारणांवरून हे शोध निबंध मागे घ्यावे लागले होते. यात आकडेवारी किंवा डेटामध्ये फेरफार अथवा लेखकांची बनावट नावे दाखविणे हे प्रकार झाले नसले तरी निबंध वा मजकुराची चोरी वा नक्कल हेही गंभीर प्रकार आहेत. 

अमेरिकेच्या स्टॅन्फर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष मार्क टेसिअर यांच्या राजीनाम्यानंतर हा प्रकार प्रकाशात आला. विद्यापीठ मंडळाने चौकशीअंती प्रा. टेसिअर यांच्यावर संशोधनादरम्यान काही आकडेवारी चोरल्याचा ठपका ठेवला होता. या कारणावरून जुलै, २०२३मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु, या प्रकरणामुळे संशोधनाच्या क्षेत्रात नामांकित विद्यापीठांमध्येही होणाऱ्या वाङ्मयचौर्याचा विषय ऐरणीवर आला.

वातावरण गढूळ
यामुळे भारतातील संशोधनाचे वातावरण गढूळ होत आहे. विद्यार्थ्यांनाही ही व्यवस्था भ्रष्ट करेल, असा इशारा हा गैरप्रकार उघडकीस आणणाऱ्या ‘इंडिया रिसर्च वॉचडॉग’चे संस्थापक, माजी प्राध्यापक डॉ. अचल अगरवाल यांनी दिला.

अभियांत्रिकी ‘अव्वल’ 
गेल्या तीन वर्षांत निबंध मागे घेण्याचे प्रकार सर्वाधिक मानव्य, पर्यावरण आणि अभियांत्रिकी शाखेत आहेत. त्या खालोखाल बिझनेस, विज्ञान आणि वैद्यकीय शाखेतून निबंध मागे घेण्याचे प्रकार घडले आहेत.

 ‘इंडिया रिसर्च वॉचडॉग’च्या पाहणीत २००६ ते २०२३ या काळात स्टॅन्फर्डने तीन, प्रिन्स्टनने दोन, ऑक्सफर्ड आणि केंब्रिजने प्रत्येकी पाच आणि सिंघुआने १० शोध निबंध मागे घेतल्याचे आढळले.

सौदी, पाकनंतर भारत
जागतिक स्तरावर सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननंतर निबंध मागे घेण्याचे प्रमाण भारतात अधिक आहे. चीनही शोधनिबंध मागे घेण्यात आघाडीवर आहे.

Web Title: 50 dissertations question IITs, professors and institutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.