तर हॉटेल व्यावसायिकांची ५० टक्के व्यवसायासाठी तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:09+5:302020-12-29T04:07:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नववर्षानिमित्त सेलिब्रेशनसाठी हॉटेल सुरू ठेवण्यासाठी दोन तासांचा अवधी वाढवून द्यावा, अशी मागणी हॉटेल चालकांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नववर्षानिमित्त सेलिब्रेशनसाठी हॉटेल सुरू ठेवण्यासाठी दोन तासांचा अवधी वाढवून द्यावा, अशी मागणी हॉटेल चालकांकडून केली जात आहे. मात्र आता संचारबंदीमुळे ११ पूर्वी रेस्टॉरंट बंद करावे लागणार आहे त्यामुळे नेहमीच्या व्यवसायाच्या तुलनेत ५० टक्के व्यवसाय करण्यासाठी हॉटेल चालकांना तारेवरची कसरत करावी लागेल, असे मत आहारने व्यक्त केले आहे.
याबाबत आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, कोरोनामुळे आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा व्यवसाय हॉटेल चालकांनी गमावला. सरकारने जे नियम लावले आहेत त्याचे पालन केले जात आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये लॉकडाऊनवरील निर्बंध शिथिल केल्यानंतरदेखील अनेक रेस्टॉरंट्स सुरू झालेली नाहीत. तर दुसरीकडे नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रात्री ११नंतर नागरिकांच्या वावरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पण नववर्षाच्या आगमनासाठी थोडेच दिवस उरले आहेत आणि आतिथ्य उद्योगाच्या व्यवसायासाठी हाच एक आशेचा किरण होता. पण या लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे हॉटेल चालकांना ५० टक्के व्यवसाय करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
ग्राहकांच्या संख्येत घट
वर्षाअखेरच्या आठवड्यात नेहमीच्या तुलनेत तिप्पट व्यवसाय होत असतो. जे ३० टक्के रेस्टॉरंट बंद झाले आहेत त्यांना सुरू होण्यास मदत मिळाली असती, पण आता तर निर्बंध लावल्याने ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मुंबई सोडून इतर ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होणार आहे, असे ते म्हणाले.