मुंबई : यंदा पालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना इनहाऊस कोट्यांतर्गत ५०% जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई विभागाचा यंदाचा पालिका शाळांचा निकाल ४० टक्क्यांनी वाढला असून तो ९३.२५% इतका लागला आहे. त्यामुळे साहजिकच उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही खूप मोठी म्हणजेच १२ हजार ७१६ इतकी आहे. मुंबई विभागात पालिकेच्या ३ कनिष्ठ महाविद्यालयात ५०% कोट्यांतर्गत प्रवेश होऊ शकणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेतील कोटा प्रवेशाचा आजचा शेवटचा दिवस असून सोमवारी सायंकाळी ७ पर्यंत १४ हजार ७९६ प्रवेश निश्चित झाले होते.
पालिका शिक्षण विभाग व शाळांनी घेतलेल्या नियोजनबद्ध मेहनतीमुळे निकाल ४० टक्क्यांनी वाढला आहे. तब्बल ७६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मात्र यंदा दहावीच्या एकूण निकालातही वाढ झाल्यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे यश झाकोळले जाऊ नये यासाठी पालिकेच्याच कनिष्ठ महाविद्यालयांत ५०% इनहाऊस कोट्यांतर्गत प्रवेशाची तरतूद पालिकेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.मुंबई विभागातून दादरच्या भवानी शंकर ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, एमसीजीएम रतनबाई वालबाई म्युनिसिपल ज्युनिअर कॉलेज ( मुलुंड), दीक्षित रोड ज्युनिअर कॉलेज (विलेपार्ले) येथे पालिका विद्यार्थ्यांना एकूण प्रवेश क्षमतेच्या ५०% जागा उपलब्ध आहेत. मात्र यासंदर्भातील माहिती मुंबई अकरावी प्रवेशाच्या विभागीय संकेतस्थळावर उपलब्ध नाही.संकेतस्थळावर माहिती उपलब्ध नाहीच : अकरावी प्रवेशाच्या शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार या विशेष इनहाऊस कोट्यासाठी सर्व प्रकारचे आरक्षण लागू असणार आहे. तसेच या आरक्षणानुसार जागांची विभागणी विभागीय उपसंचालक कार्यालयांना आपल्या संकेतस्थळावर दर्शविणे आवश्यक आहे. मात्र यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नसून केवळ एकूण प्रवेशित जागांची माहिती देण्यात आली आहे.