वृद्घेस ५० लाखांचा गंडा
By admin | Published: December 14, 2015 02:13 AM2015-12-14T02:13:11+5:302015-12-14T02:13:11+5:30
घर शोधून देण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेकडून तब्बल ५० लाखांची रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली.
मुंबई : घर शोधून देण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेकडून तब्बल ५० लाखांची रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. आवेज अन्सारी असे या आरोपीचे नाव असून, तो वांद्रे परिसरातच एका स्थानिक वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याचे
समोर आले आहे.
वांद्रे परिसरात राहणाऱ्या जुबेदाबाई यांना जोगेश्वरी परिसरात एक घर घ्यायचे होते. ही बाब त्यांनी त्यांच्या एका नातेवाइकाला सांगितली. त्यानुसार स्थानिक पत्रकार असलेल्या आणि इस्टेट एजंटचे काम करणाऱ्या या आरोपीचा नंबर महिलेच्या नातेवाइकाने या महिलेला दिला. त्यानुसार महिलेने आरोपीशी संपर्क साधल्यानंतर त्याने बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत महिलेस ४८ लाखांना घर शोधून दिले. त्यानंतर बुकिंग आणि बिल्डरला पैसे द्यायचे असल्याचे सांगत त्याने महिलेकडून एकूण ४८ लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेला पैसे दिल्याचे बनावट पेपरदेखील दिले. सहा महिन्यांनंतर ही महिला इमारतीत गेली असता, कोणीच अशाप्रकारे घर बुक केले नसल्याचे तिला सांगण्यात आले. आरोपीचा मोबाइल नंबर सतत बंद आल्याने फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यानुसार तिने याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शुक्रवारी या आरोपीला वांद्रे पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी
ठोठावली आहे. (प्रतिनिधी)