पहिल्या तिमाहीची आकडेवारी; गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या तीन महिन्यांत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ५० लाख ९१ हजार प्रवाशांनी हवाई सफरीचा आनंद लुटला. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हवाई वाहतुकीचे चाक हळूहळू गतिमान होत असल्याचे चित्र आहे.
भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मार्च २०२० पासून हवाई प्रवासावर निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे प्रवासी संख्येत मोठी घट झाली. डिसेंबर महिन्यात रुग्णवाढ आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर विमान प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यांत मुंबई विमानतळावरून ५० लाख ९१ हजार ७३० प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी ४९ हजार १६० विमानांचा वापर करण्यात आला.
यात देशांतर्गत प्रवाशांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ४५ लाख ७० हजार १५० इतकी आहे. ४१ हजार ४०७ विमानांद्वारे या प्रवाशांना सेवा देण्यात आली. तसेच जानेवारी ते मार्चदरम्यान मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ५७० होती. या काळात ७ हजार ७५९ विमानांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण केले.
असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत जवळपास ५० टक्के घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत तब्बल १ कोटी ४ लाख २६ हजार ७८९ प्रवाशांनी हवाई सफर केली होती.
* ...या ठिकाणांना सर्वाधिक पसंती
आंतरराष्ट्रीय..... प्रवासी संख्या........ देशांतर्गत...... प्रवासी संख्या
दुबई....... १,६०,१६९...... दिल्ली....... ६,५७,४६७
न्यूयॉर्क....५४,४०६....... गोवा...... ४,३६,८९९
माले......५०,१६८...... बंगळुरू...... ३,०९,१६८
------------------