लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना मिळणाऱ्या ५० लाखांच्या मदतीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई बंदरावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांची मदत देण्याचा आदेश केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने सर्व बंदर व्यवस्थापनांना दिला. या आदेशाची मुदत अलीकडेच संपुष्टात आली. मात्र, देशभरात कोरोनाचा कहर अद्यापही सुरू असल्याने या आदेशास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कोरोना कवचाची मुदत संपल्यामुळे या संकटकाळात अखंड सेवा देणारे कर्मचारी चिंतेत होते. त्यामुळे कोरोनाकाळातील मदतीस मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा व केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आदेशास मुदतवाढ देण्यात आली, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.