लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलीच्या सुखी संसारासाठी वडिलांनी चांगला हुंडा, ८४ लाख रुपयांचा खर्च करूनही चेन्नईतील तथाकथित उच्चशिक्षित तरुणाशी विवाह झाल्यानंतर मालमत्तेसाठी छळवणूक करून तिला घराबाहेर काढणाऱ्या नवरा आणि सासरच्या मंडळींविरोधात अखेर मुलीने माटुंगा पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे सदर तरुण हा एम.टेक. नसल्याचेही निष्पन्न झाल्याने तेथेही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
माटुंगा परिसरात ही २७ वर्षीय तक्रारदार तरुणी आई-वडिलांसोबत राहते. ती एका नामांकित कंपनीत अधिकारी आहे, तर तिचे वडील कस्टम विभागात सहायक आयुक्तपदी आहेत. त्यांना चेन्नईच्या एम.टेक. झालेल्या तरुणाच्या स्थळाची माहिती मिळाली. मुलगा उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी असल्याने बोलणी झाली. मुलाच्या कुटुंबीयांनी महागडी कार, ५० लाखांचा हुंडा, फर्निचर, तसेच, दागिन्यांची मागणी केली. स्थळ चांगले वाटल्याने कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिला. मात्र, काही दिवसांतच सासूने तिच्याकडे हुंड्याच्या उर्वरित पैशांसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली, तरुणीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
शैक्षणिक पदवीतही केली फसवणूकविशेष म्हणजे आपला ज्या मुलाशी विवाह झाला आहे. तो एम.टेक. झालाच नसल्याचे समजताच तिला धक्का बसला. तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी काही नातेवाइकांना मुलीच्या सासरी पाठवून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सासरच्या मंडळीचा छळ वाढताच वडिलांनी महिला आयोगाकडे धाव घेतली.