Join us

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख आर्थिक मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:07 AM

परिवहनमंत्री अनिल परब यांची सरकारकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ...

परिवहनमंत्री अनिल परब यांची सरकारकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक, लाखो परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवणे, हजारो विद्यार्थ्यांना परराज्यातून सुखरूप घरी घेऊन येणे, हजारो ऊस तोडणी मजुरांना कारखान्यांपासून त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाणे, अत्यावश्यक व कृषिजन्य मालाची वाहतूक करणे, वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यासाठी टँकरला चालक पुरविणे, शासकीय रुग्णवाहिकांना चालक पुरविणे अशा अनेक कामांमध्ये धोका पत्करून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सेवा बजाली आहे. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, पोलीस यासारख्या कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून एसटीच्या कर्मचाऱ्यांनीही काम केले आहे. परब म्हणाले की, कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच हजारो कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत.

एसटी महामंडळाने शासनाच्या निर्देशानुसार त्यांनी आखून दिलेल्या नियम व अटी-शर्थींच्या अधीन राहून ३१ डिसेंबर २०२० अखेर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत महामंडळाच्या आर्थिक निधीतून केली आहे. दुर्दैवाने इतर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांनाही आर्थिक मदत करण्याची इच्छा असूनही महामंडळाच्या आर्थिक अडचणीमुळे मदत करणे शक्य होत नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून ५० लाख रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

...................