शरीरातून इन्फेक्शन काढण्याच्या नावे कॅन्सर रुग्णाची ५० लाखांची फसवणूक! बोगस डॉक्टरवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 08:16 AM2023-11-28T08:16:48+5:302023-11-28T08:17:26+5:30
Crime News: प्लाझ्मा सेलचा कॅन्सर झालेल्या एका रुग्णाच्या शरीरातून पित्त काढण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरसह तिघांविरोधात कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : प्लाझ्मा सेलचा कॅन्सर झालेल्या एका रुग्णाच्या शरीरातून पित्त काढण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरसह तिघांविरोधात कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांची नावे राहुल बजाज (३५), डॉ. एम. पटेल (५५) आणि इम्रान (३५) अशी आहेत.
तक्रारदार ६३ वर्षीय महिला असून बोरिवली पूर्वच्या राजेंद्रनगर परिसरात राहतात. त्यांच्या पतीला २०११ साली प्लाझ्मा सेलचा कर्करोग झाला होता.
त्यामुळे त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. तक्रारदार २७ ऑक्टोबर रोजी पुण्याला जाताना स्वतःचे नाव राहुल बजाज सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी ओळख काढली. त्याने पतीला अहमदाबादेतील डॉ. एम. पटेलकडे नेण्याचा सल्ला दिला. डॉ. पटेलने एका सेशनचे ८ हजार रुपये घेतो असे सांगितले. तक्रारदाराने पाठवलेल्या पत्त्यावर १० नोव्हेंबर रोजी इम्रान आला. तक्रारदाराच्या पतीच्या अंगाला त्याने तेल लावले. नंतर डॉ. पटेल याने त्यांच्या हातापायावर ब्लेडने चिरा मारल्या. त्यात मेटल क्यूब टाकत तोंडाने हवा खेचत पिवळसर पदार्थ काढला. पित्त असल्याचे सांगत त्याने कागदावर जवळपास ६४४ पित्ताचे थर साठविले. साठवलेला पदार्थ पू असून तो मी टेस्टिंगला घेऊन जात असून या उपचाराचे ५० लाख बिल झाल्याचे त्याने तक्रारदाराला सांगितले.
पावडर पाठवतो, फरक पडेल
मी तुमच्या पतीच्या उपचारासाठी एक पावडर पाठवीन ज्याने त्यांना फरक पडेल, असे डॉ. पटेल तक्रारदाराला म्हणाला. त्यानुसार महिलेने चेक तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून रक्कम पाठवली. मात्र त्यांना कोणतीही पावडर पाठवण्यात आली नाही, तसेच त्यांच्या पतीची तब्येतही खालावली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या विरोधात त्यांनी कस्तुरबा पोलिसात धाव घेतली.