उमेदवारीसाठी ५० लाख दर?
By Admin | Published: February 2, 2017 03:27 AM2017-02-02T03:27:48+5:302017-02-02T03:27:48+5:30
अन्य प्रस्थापित राजकीय पक्षाप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या रणांगणात पहिल्यांदा उतरलेल्या एमआयएमच्या कार्यपद्धतीतही ‘अर्थ’कारणाचा मोठा भाग असल्याचे चव्हाट्यावर
- जमीर काझी, मुंबई
अन्य प्रस्थापित राजकीय पक्षाप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या रणांगणात पहिल्यांदा उतरलेल्या एमआयएमच्या कार्यपद्धतीतही ‘अर्थ’कारणाचा मोठा भाग असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. उमेदवार निश्चितीसाठी ५० लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र पूर्तता न केल्याने आपल्याला जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा आरोप अॅड. आदिल खत्री यांनी केला आहे.
प्रचाराच्या सुरुवातीलाच पैशांच्या निकषावर तिकिटाचे वाटप केले जात असल्याच्या आरोपामुळे ‘एमआयएम’ला सुरुवातीलाचा मोठा झटका बसला आहे. एमआयएमने मात्र हा आरोप फेटाळून लावत पक्षाने केलेल्या सर्व्हेनुसार उमेदवार बदलल्याचे स्पष्ट केले आहे.
एमआयएमकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मुंबईत ५५ ते ६० जागांवर पक्ष उमेदवार देणार आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्याही जाहीर झाल्या आहेत. त्यात २३ जानेवारीला जाहीर करण्यात आलेल्या १८ उमेदवारांच्या पहिल्या यादीत वॉर्ड क्र. ९६ मधून जय फाउंडेशनचे अॅड. आदिल खत्री यांचे नाव होते. मात्र आता त्यांचे तिकीट कापून शाहीद नावाच्या तरुणाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
अॅड. खत्री यांनी बिल्डर लॉबीच्या दबावामुळे आपले तिकीट कापण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, पक्षाने सुरुवातीला आपल्याला सात लाख रुपये देण्यास सांगितले होते.
त्यानुसार आपण ही रक्कम जमा केली. त्यानंतर २४ तारखेला वॉर्ड क्रमांक ९६ मधून उमेदवारी दिल्याचे अधिकृत पत्र दिले. मात्र दोन दिवसांपूर्वी पक्षाचे हैदराबाद येथील आमदार व मुंबईतील निरीक्षक अहमद बाला यांनी आपल्याकडे ५० लाखांची मागणी केली. मात्र आपल्याकडे
एवढी रक्कम नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तिकीट रद्द करून दुसऱ्या व्यक्तीला दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
रक्कम देणे अशक्य
आपण सामान्य कार्यकर्ता असून पक्षाने मागितलेली रक्कम देणे शक्य नसल्याने माझे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे अशा पक्षात आपल्याला काम करण्याची इच्छा नसल्याने आपण तातडीने एमआयएमचा राजीनामा दिला आहे.
- अॅड. आदिल खत्री
आरोप धादांत खोटा
अॅड. खत्री यांचा आरोप धादांत खोटा आहे. पक्षाने केलेल्या सर्व्हेमध्ये त्यांच्यापेक्षा शाहीद नावाच्या तरुणाला स्थानिकांनी अधिक पसंती दिली. त्यामुळे वॉर्ड क्र. ९६ मधून त्यांना तिकीट देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. खत्री यांच्या आरोपाचा काहीही परिणाम होणार नाही.
- अॅड. वारीस पठाण, आमदार, एमआयएम