मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गोंधळामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ७५ गुणांच्या प्रश्नपत्रिकेऐवजी ५० गुणांची प्रश्नपत्रिका शनिवारी देण्यात आली. यावर आपल्याकडून झालेली चूक विद्यापीठाने मान्य केली असली तरी त्यानंतर देण्यात आलेल्या नव्या प्रश्नपत्रिकाही तब्बल एक तास विलंबाने विद्यार्थ्यांना मिळाल्या. परिणामी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.सध्या तृतीय वर्ष पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता ‘बिझनेस जर्नालिझम आणि मॅगझिन’ या विषयाची परीक्षा होती. यावेळी विद्यार्थ्यांना ७५ ऐवजी ५० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही चूक विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपस्थित शिक्षकांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर विद्यापीठातून प्रश्नपत्रिका आल्याचे कारण विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी चुकीच्या प्रश्नपत्रिकांचा तगादा लावल्यानंतर तब्बल १ तासांनी विद्यार्थ्यांना नवी प्रश्नपत्रिका देण्यात आली. आणि वाढीव वेळ देण्यात आली. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आणखी किती मानसिक त्रास देणार? असा सवाल विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला केला आहे. (प्रतिनिधी)मुंबई विद्यापीठ काय म्हणते...शनिवारी झालेल्या गोंधळावर विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले आहे. ही चूक अनावधानाने झाली, असे विद्यापीठाने म्हटले आहे. शिवाय लिफाफ्यात चुकीच्या प्रश्नपत्रिका भरल्यामुळे गोंधळ झाला. चुकीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्या हे कळल्यावर तातडीने सुधारीत प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ५० गुणांचीच प्रश्नपत्रिका
By admin | Published: April 17, 2016 1:33 AM