Join us  

पहिल्याच दिवशी ५० टक्के शस्त्रक्रिया रद्द, आरोग्य सेवेला संपाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 6:07 AM

राज्यातील शासकीय १७, मुंबई महापालिकेची चार तर ठाणे महापालिकेचे कळवा येथील एक अशा २२ रुग्णालयांत निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) पुकारलेल्या संपाला सोमवारपासून सुरुवात झाली. या राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील आरोग्य सेवेला संपाचा फटका बसला. संपापूर्वी नियोजित शस्त्रक्रियांपैकी निम्म्या शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. 

राज्यातील शासकीय १७, मुंबई महापालिकेची चार तर ठाणे महापालिकेचे कळवा येथील एक अशा २२ रुग्णालयांत निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. साधारणत: आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, ओपीडीमध्ये रुग्णसंख्या लक्षणीय असते. संपाची माहिती असल्याने काही रुग्णालयांत ही रुग्णसंख्या रोडावल्याचे चित्र होते. रुग्णांवरील उपचाराची धुरा प्राध्यापकांनी सांभाळली होती. तर ऑपरेशन थिएटर्समध्ये ५० टक्के डॉक्टरांची उपस्थिती होती. 

संपाचा दृश्य परिणाम ओपीडीतील उपचारांवर जाणवला. रुग्णांना उपचारांसाठी ताटकळावे लागत होते. मात्र, सगळ्यांना उपचार मिळाले.  विशेष म्हणजे अनेक रुग्णांना या संपाची अगोदरपासून माहिती असल्यामुळे आणि नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे नेहमीसारखे सोमवारच्या ओपीडीमध्ये रुग्णच आले नव्हते.  महापालिकेच्या रुग्णालयात लांबच्या लांब रांगा होत्या. 

निवासी डॉक्टर कामावर?   निवासी डॉक्टरांचा संप सुरू असला तरी काही डॉक्टरांनी नियोजित शस्त्रक्रिया करण्यासाठी हातभार लावला होता. त्यामुळे फारसा त्रास या संपाचा जाणवला नसल्याचे महापालिकेतील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.  नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात ५० टक्के नियोजित शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच कूपर रुग्णालयाने अगोदरच संप माहीत असल्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया ठेवल्या नव्हत्या. त्यामुळे संपामुळे अपेक्षित असणारा गोंधळ मात्र सोमवारी दिसला नाही.

रुग्णालय प्रशासन चुकीची माहिती देत आहेनिवासी डॉक्टर संपावर आहेत. त्यामध्ये फूट पडलेली नाही. ५० टक्के नियोजित शस्त्रक्रिया झाल्याची माहिती चुकीची आहे. केवळ अतितत्काळ सेवाच सुरू आहेत. रुग्णालय प्रशासन त्यांची बाजू मांडत आहे. कोणत्याही डॉक्टरांनी नियोजित शस्त्रक्रियेत भाग घेतलेला नाही. आमच्या बरोबर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कोणीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे आमचा संप असाच यापुढे चालू राहणार आहे.     - डॉ. अविनाश दहिफळे, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड, महाराष्ट्र राज्य

१५ जानेवारीपर्यंत हॉस्टेलचा प्रश्न मार्गी लागणारमुंबई : निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचा प्रश्न १५ जानेवारीपर्यंत मार्गी लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे डॉक्टरांना दोन दिवसांत कोविड भत्ताही सुरू केला जाईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सोमवारी दिली. या आंदोलनात डॉक्टरांनी सहभाग घेतला असला तरी या आंदोलनाचा परिणाम पूर्णपणे झाला नाही. रुग्णांची गैरसोय होणार नाही ओपीडी सुरू राहील याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती असेही डॉ. संजीव कुमार म्हणाले. निवासी डॉक्टरांना १० हजार रुपये कोविड भत्ता देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे तसेच डॉक्टरांसाठी हॉस्टेलमध्ये चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यात येणार असून लवकरच त्याच्या निविदा काढण्यात येतील, अशी माहिती डॉ. कुमार यांनी दिली.

टॅग्स :डॉक्टरमुंबई