'आई' धोरणांतर्गत MTDCच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत; गिरीश महाजन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 04:22 PM2023-12-30T16:22:54+5:302023-12-30T16:25:01+5:30

एमटीडीसीची रिसॉर्ट्स / पर्यटक निवासे ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत.

50 percent discount for women in MTDC's tourist accommodations under the 'Ai' policy; Information from Girish Mahajan | 'आई' धोरणांतर्गत MTDCच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत; गिरीश महाजन यांची माहिती

'आई' धोरणांतर्गत MTDCच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत; गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई: राज्यशासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री महाजन म्हणाले, एमटीडीसीची रिसॉर्ट्स / पर्यटक निवासे ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण 34 पर्यटन निवासे, 27 उपहारगृहे असून, निवास व न्याहारी (Bed and Breakfast), महाभ्रमण, कलाग्राम, अभ्यागत केंद्र (Visitor Centre’s), इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलिकडेच जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायविंग (IISDA) इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.

महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये 6 जागतिक वारसा स्थळे, 850 हून अधिक लेण्या, 400 च्या जवळपास दुर्ग व गडकिल्ले आहेत. तसेच महाराष्ट्र विविध पर्वत रांगा, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्या, सांस्कृतिक वारसा, रुढी, परंपरा, वेशभूषा, सण, उत्सव यांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रातील ही प्रेक्षणीय, निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळे देशी आणि विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. 1975 मध्ये स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रथम क्रमांकाची आणि कायम अग्रस्थानी येणारी पर्यटन संस्था आहे. ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये केली जाते. रिसॉर्टस आणि पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य उत्तमरित्या करणारे महाराष्ट्रामधील नामवंत महामंडळ म्हणून एमटीडीसीकडे पाहिले जाते. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या www.mtdc.co. या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे. यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. ही सवलत 01 ते 08 मार्च या कालावधीसाठी वैध असेल. ही सवलत, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. सवलतीमध्ये नाश्त्याचा समावेश नाही. या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही. ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतीं सोबत जोडली जाऊ शकत नाही. एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल.

Web Title: 50 percent discount for women in MTDC's tourist accommodations under the 'Ai' policy; Information from Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.