मुंबई : राज्यभरात फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून, मुंबई पोलीस दलातही जवळपास ५० टक्के पोलिसांनी लस घेतली आहे.यात महिला पोलिसांचे प्रमाणही अधिक आहे.
कोरोनाकाळात लॉकडाऊन, जमावबंदी आदेशाच्या अंमलबजावणीसह महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या, नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापासून अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या व्यक्ती स्थानबद्ध आहेत नात्याची खातरजमा, लागण झालेल्या वस्त्या किंवा इमारती पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर तेथील बंदोबस्त, आदी सर्वच जबाबदाऱ्या पोलिसांवर आहे. यात पोलीस ठाण्यात कार्यरत मनुष्यबळावर सर्वाधिक ताण आहे. या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप आणि संसर्गाची लागण न होता परतेल का, हे दडपण या पोलीस वसाहतींवर होते. याच वेळी मुंबईतील ९९ पोलिसांना जीव गमवावा लागला. अशात फ्रंटलाईन वर्कर असलेल्या पोलिसांनाही लस देण्यास सुरुवात झाली.
मात्र याबाबत संभ्रम असल्याने अनेकजण पुढे येण्यास घाबरत होते. त्यात घाटकोपरमध्ये लस घेतलेल्या पोलिसाला दुसऱ्या दिवशी कोरोना झाल्याचे समजताच यात भर पडली. गेल्या महिन्यात कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केईएम रुग्णालयात लस घेतल्यानंतर सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले. तसेच ही लस आपल्या फ़ायद्यासाठी असून सर्वांनी लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दुसरा डोस घेण्यासही सुरुवात
अनेक पोलिसांनी लसीचा दुसरा डोस घेण्यास सुरुवात केली आहे.
....
लसीबाबत संभ्रम
लसीबाबत अजूनही काही पोलिसांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे काहीजण पुढे येण्यास टाळाटाळ करतानाही दिसत आहेत. मात्र वरिष्ठांकडून वेळोवेळी त्यांना याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.