वांगणी रेल्वेस्थानकात एका अंध महिलेचा चिमुकला रेल्वे रुळावर पडलेला असताना समोरून भरधाव येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसखाली चिरडला जाण्याची शक्यता होती. यावेळी स्थानकात कार्यरत असलेले पॉइंट्समन मयूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा जीव धोक्यात घालून आधी त्या मुलाचा आणि नंतर स्वतःचा जीव वाचवला. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यावर मयूरच्या धाडसाचे कौतुक देशभरात झाले. त्याच मयूर शेळके यांनी आता आपल्या मानवतावादी विचारसरणीची प्रचिती दिली आहे. त्यांना रेल्वे प्रशासनाकडून बक्षीस स्वरूपात ५० हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. या बक्षिसातील ५० टक्के रक्कम अंध महिलेच्या मुलाच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय मयूर यांनी घेतला आहे. मयूरच्या या निर्णयाचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मयूर हा केवळ धाडसी व्यक्ती नसून एक संवेदनशील व्यक्तीही असल्याचे समोर आले आहे.
कोट :
रेल्वेने बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. ती रक्कम आल्यावर त्यातील ५० टक्के रक्कम त्या मुलाच्या शिक्षणासाठी देणार आहे. त्या मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून, माझ्या या प्रयत्नांमुळे इतर लोकही आपल्या आसपास असलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करतील, अशी अपेक्षा आहे.
- मयूर शेळके, पॉइंट्समन