रस्त्यावरील वाहतुकीत ५० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:06 AM2021-04-07T04:06:59+5:302021-04-07T04:06:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी रात्रीपासून कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सकाळपासून मुंबईतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी रात्रीपासून कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सकाळपासून मुंबईतील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली हाेती. नेहमीच्या तुलनेत रस्त्यावरील ५० टक्के वाहनांमध्ये घट झाली, असे वाहतूक विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
मंगळवारी सकाळपासूनच बस आणि एसटीमध्ये नेहमीच्या तुलनेत तुरळक प्रवासी होते. कठोर नियमावलीमुळे अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर बऱ्यापैकी शुकशुकाट होता. दादर, वरळी, एलबीएस मार्ग, इस्टर्न, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, फ्री वे, लालबाग उड्डाणपूल, बीकेसी या भागात वाहनांची वर्दळ कमी हाेती.
एस. टी.च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने एस. टी. वाहतूक बंद आहे. मुंबईत एस. टी.ला अल्प प्रतिसाद मिळत आहे. काही निवडक गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार एस. टी.तून आसन क्षमतेइतकी प्रवासी वाहतूकची मुभा दिली आहे. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही.
* वाहतूककोंडीतून सुटका
मुंबईत दररोजच्या तुलनेत मंगळवारी वाहनांची गर्दी कमी हाेती. मुंबईत कामासाठी येणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र हाेते. रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने अपवाद वगळता फार वाहतूककोंडी झाली नाही, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
* रिक्षाचे ५०, तर टॅक्सीचे ६० टक्के प्रवासी घटले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २, तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. लोक घराबाहेर पडत नसल्याने रिक्षाचे प्रवासी ५० आणि टॅक्सीचे ६० टक्क्यांनी कमी झाले, असे टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोक्स यांनी सांगितले.
* मालवाहतुकीलाही फटका
कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मालवाहतुकीसाठी कामगारांची कमतरता आहे. अनेक कंपन्यांनी माल भरला नाही. मंगळवारी तर नेहमीच्या तुलनेत ५० गाड्या उभ्या होत्या. सरकारने कोरोनाबाबत कठोर पावले उचलावीत. पण, वाहतूकदार, चालक त्यांच्या कुटुंबीयांचाही विचार करावा. कर सवलत आणि बँक हप्त्यामध्ये दिलासा दिला जावा.
- बाल मालकीत सिंग, अध्यक्ष कोअर कमिटी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस
-------------------