मुंबई : सहा वर्षांच्या सोहमच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. ''घरात कुणाच्याही सूचना न पाळणारा सोहम गणरायाच्या दर्शनाच्या वेळी मात्र माझ्या सर्व सूचना ऐकत होता आणि शांतपणे मी सांगेन तसं वागत होता. 'गणपती बाप्पा मोरया' असं जेव्हा तो म्हणाला, तो आनंद अवर्णनीय होता"! सोहमची आई भरभरून बोलत होती...
स्वमग्नतेमुळे सोहमला लोकांमध्ये सहज मिसळता येत नाही. योग्य संवाद साधणं तर दूरची गोष्ट. काहीसा असाच प्रकार आहे सेरिब्रल पाल्सीग्रस्त प्रितेशचा. पण गणराच्या दर्शनाने प्रितेशलाही अत्यानंद झाला. सोहम, प्रितेश यांसारख्या 'डेव्हलपमेंट इश्यूज' असलेल्या तब्बल 50 मुला-मुलींनी आज दुपारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. निमित्त होतं, चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरने गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ग्रुप थेरपीचं.
'ऑटिझम, सेरिब्रल पाल्सी यांसारख्या मनोवस्थेतील विशेष मुला-मुलींना समाजात सहज मिसळता येत नाही. सर्वसामान्य मुलं ज्या सूचना सहज पाळतात, त्यांचं पालन विशेष मुलांकडून होत नाही. त्यामुळे लोकांमध्ये गेल्यावर त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. विशेष मुलांवर उपचार करणा-या मानसोपचारतज्ज्ञांच्या मते यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे, ग्रुप थेरपी. त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून आम्ही विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना घेऊन गणेश दर्शनाचा उपक्रम आयोजित करतो", अशी माहिती चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक डॉ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं.
ग्रुप थेरपीमुळे नेमके काय फायदे होतात :
1. ऑटिझम, सेरिब्रल पाल्सीग्रस्त विशेष मुलांमधील गर्दी-लोकांविषयीची भीड चेपते व त्यांच्यातील संवाद कौशल्ये विकसित होण्यास सहाय्य होते.
2. वाढ-विकासविषयक समस्या असलेल्या मुलांमधील सामाजिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.
3. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीयपणे सहभागी होण्यास पालक प्रेरित होतात.
4. गर्दीच्या ठिकाणी विशेष मुलांना हाताळण्याचा पालकांमध्ये विश्वास निर्माण होतो.
5. डेव्हलपमेंटल डिसॉर्डर्सविषयी समाजात जनजागृती होऊन त्यांचा सहज सामाजिक स्वीकार होतो.
6. विशेष मुलांनाही सण-उत्सव साजरा करण्यासाठीची समान संधी उपलब्ध होते.