Join us  

फेरीवाला नोंदणीसाठी पालिकेने छापले ५० हजार अर्ज

By admin | Published: June 23, 2014 10:44 PM

ठाणे महापालिकेने फेरीवाला धोरण निश्चित केले असून त्यानुसार आता प्रत्यक्षात अर्ज वितरण करण्यास सुरु वात केली

ठाणे - ठाणे महापालिकेने फेरीवाला धोरण निश्चित केले असून त्यानुसार आता प्रत्यक्षात अर्ज वितरण करण्यास सुरु वात केली आहे. गेल्या सहा दिवसांत ५ हजार ६०० च्या आसपास अर्ज वितरीत करण्यात आले आहेत. परंतु, शहरातील वाढत्या फेरीवाल्यांचा आवाका पाहता पालिकेने ५० हजारांची छपाई केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या अर्ज वितरणावरूनच शहरात किती फेरीवाले असू शकतात, याचा अंदाज येणार आहे. मात्र, खरे फेरीवाले आणि खोटे फेरीवाले यांची सत्यता पडताळण्यासाठी प्रभाग समितीनिहाय समित्या गठीत केल्या जाणार आहेत. फेरीवाला धोरणानुसार आता नऊ प्रभाग समिती अंतर्गत फेरीवाल्यांचा सर्व्हे केला जाणार असून ज्या पद्धतीने आधारकार्ड नागरिकांना दिले जात आहेत, त्याच धर्तीवर फेरीवाल्यांना फेरीवाला कार्ड दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार, १६ जूनपासून या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीस प्रत्यक्षात सुरु वात झाली असून अर्र्ज वितरण करण्यात येत आहेत. त्यातच सहा दिवसांत ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत ५ हजार ६०० अर्ज वितरीत करण्यात आले आहेत. दिवसाला सुमारे १०० अर्ज एका प्रभाग समिती अंतर्गत वितरीत केले जातात. ठाणे शहरामध्ये फेरीवाल्यांची संख्या किती आहे, याची नोंदच नसल्यामुळे पालिकेने सुमारे ५० हजार अर्ज छापले आहेत. परिणामी, मूळ फेरीवाल्यांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाला धोरणात स्वत:ला सामावून घेण्यासाठी अर्ज विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रभाग समितीनिहाय समित्या तयार केल्या जाणार असून त्यानंतर फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीवरून शहरात किती फेरीवाले आहेत, याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच तो फेरीवाला कुठे बसतो, त्याच्या कामाचे स्वरूप काय, याची माहिती अर्ज भरून घेतली जाणार आहे. त्यानंतर, फेरीवाल्यांचे आरक्षण टाकले जाणार आहेत. त्यातच आधारकार्डच्या धर्तीवर फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच ही नोंदणी केल्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने फेरीवाला कार्ड दिले जाणार असल्याची माहिती अतिक्र मण विभागाचे उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी दिली. (प्रतिनिधी)