हेल्पलाइन क्रमांकावर विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:14 AM2020-10-09T03:14:22+5:302020-10-09T03:15:18+5:30
‘आयडॉल’कडून ५० हजारांहून अधिक समस्यांचे निवारण; सायबर हल्ल्याची तक्रार दाखल
मुंबई : आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. याचदरम्यान आयडॉलच्या हेल्पलाइनवर न मिळालेल्या मदतीचा जास्त मानसिक त्रास झाल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत. दुसरीकडे आयडॉलच्या दोन्ही हेल्पलाइनवर ३ तारखेपासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रतिसाद देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ९६१९४८६२६५, ९६१९५३६८२९ आणि ९६१९७१३३४८ या तीन संपर्क क्रमांकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रकारच्या तक्रारींचे निवारण केले जाते तर, परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणींसाठी दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) व विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांनी ०८०-४७१९१११६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यातील ज्या खासगी कंपनीला कंत्राट दिले त्यांच्या हेल्पलाइनवरून विद्यार्थ्यांना मंगळवारी कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी त्यांनी विद्यापीठाकडे केल्या.
विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावरही अनेक तक्रारी येत असल्याने ३ हेल्पलाइनवर सर्वच तक्रारींचे उत्तर देणे शक्य झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. एक तक्रार सोडविताना, ५ ते ६ मिस्ड कॉल होत असले तरी ५० हजारांहून अधिक तक्रारी अटेंड केल्याची माहिती आहे.
दरम्यान, अंतिम वर्षाच्या विद्यापीठ विभाग व आयडॉलच्या आॅनलाइन परीक्षांसाठी ज्या खासगी सेवा पुरवठादाराला कंत्राट दिले आहे त्यांनी परीक्षेदरम्यान सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची तक्रार सायबर सेलकडे दाखल केल्याची माहिती प्रशासनाने दिली.