मुंबई : माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठीची हेक्टरी २८ हजार रुपयांची मर्यादा वाढवून ५० हजार करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे. मंत्रालयात माजी मालगुजारी तलाव तसेच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासंबंधात निकष बदलविण्याबाबत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित होत्या. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर या जिल्ह्यांमधील माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी असलेला हेक्टरी २८ हजार रुपयांचा निधी अपुरा पडत असल्यामुळे ही खर्च मर्यादा वाढविणे गरजेचे झाले आहे. ही मर्यादा ५० हजार केल्यामुळे माजी मालगुजारी तलावांची दुरुस्तीची कामे, विशेषत: गाळ काढण्यावर भर देण्यात येणार असून त्यामुळे माजी मालगुजारी तलावांची साठवण क्षमता वाढवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भात एकूण ६,७३४ माजी मालगुजारी तलाव आहेत. त्यातील १,७४३ तलावांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी ६३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तलावांची कामे २ वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.
दुरुस्तीसाठी खर्च मर्यादा ५० हजार
By admin | Published: September 17, 2015 2:59 AM