५० ते ६० महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेलिंग; शिवडीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 09:51 AM2022-09-02T09:51:14+5:302022-09-02T09:51:35+5:30
पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे.
मुंबई: शिवडीतील दारूखाना येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका टोळीचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवडी परिसरात राहत असलेले तीन जण येथील बोटहार्ट रोड झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या अर्धवट उघड्या खिडक्या आणि दरवाजांच्या फटीतून त्यांच्या खाजगी कृतींचे अश्लील शूटिंग मोबाइलमध्ये करून घेत ते पेन ड्राइव्हमध्ये जतन करत असल्याची तक्रार शिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३५४ (क), २९२ आणि ३४ यासह माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (इ) आणि ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
महिलांच्या अश्लील व्हिडीओ शूटिंगचा हा प्रकार २०१९ आणि २०२० आहे. या काळात हा प्रकार घडला असल्याची माहिती यातील फिर्यादी यांना २८ ऑगस्टला झालेल्या एका भांडणानंतर समजली होती. याच माहितीच्या अधारे शिवडी पोलिसांच्या पथकाने परिसरातून गोपनीयरीत्या माहिती गोळा करत ठोस तांत्रिक पुरावे हस्तगत करून सतीश धनवेल हरिजन (२९०, स्टिफन मुर्गेश नाडर (२१) आणि सरवना तंगराज हरिजन (२३) या तिघांना ताब्यात घेतले, तिघांचाही गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली.
५० ते ६० महिलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल-
महिलांच्या अश्लील व्हिडीओ शूटिंग करत असलेल्या या टोळीने सुमारे ५० ते ६० महिलांचे अश्लील व्हिडीओ घेऊन सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यानुसार पोलीस या तिघांकडे कसून चौकशी करत आहेत.