मुंबई :माहीम समुद्रातील बांधकाम तोडण्यात आल्यानंतर माहीम चौपाटी लगतचे ५० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. मुंबई उप जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रा नुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात होता.
माहीम चौपाटी लगत बेकायदा बांधकामे उभारण्यात आली असून ती तात्काळ तोडण्याबाबत मुंबई शहर निवासी उप जिल्हाधिकारी यांच्याकडून पालिकेला २२ मार्च रोजी सायंकाळी पत्र देण्यात आले. या पत्रानुसार 'परिमंडळ २' चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनानुसार व जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी धडक कारवाई करण्यात आली या कारवाई वेळी परिसरातील ४० ते ५० झोपड्या हटविण्यात आल्या.
कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माहीम विभागात पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सदर कार्यवाही दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी गठीत केलेली पथके उपस्थित होती.