दारूबंदीसाठी वॉर्डातील एकूण मतदारांच्या 50 टक्क्यांची अट तीन महिन्यात बदलणार- चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:49 PM2018-03-28T15:49:49+5:302018-03-28T15:49:49+5:30
दारूबंदी करायची झाल्यास संबंधित वॉर्डातील एकूण मतदारांपैकी 50 टक्के महिला किंवा मतदार उपस्थित राहून त्यांनी दारूबंदीच्या विरोधात मतदान केल्यास दारूबंदी केली जाते, या अटीला आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासह सर्वच पक्षाच्या सदस्यांनी हे घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेतल्यामुळे या निर्णयाचा येत्या तीन महिन्यांत फेरविचार करण्याची घोषणा उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुंबई- दारूबंदी करायची झाल्यास संबंधित वॉर्डातील एकूण मतदारांपैकी 50 टक्के महिला किंवा मतदार उपस्थित राहून त्यांनी दारूबंदीच्या विरोधात मतदान केल्यास दारूबंदी केली जाते, या अटीला आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासह सर्वच पक्षाच्या सदस्यांनी हे घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेतल्यामुळे या निर्णयाचा येत्या तीन महिन्यांत फेरविचार करण्याची घोषणा उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
अमरावती जिल्ह्यातील वरूड शहराच्या मध्यवस्तीमध्ये देशी दारू विक्रीची पाच दुकाने असून, याच परिसरात कपडा मार्केटसह भाजीपाला मार्केट व राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत. तसेच या दुकानांच्या परिसरातच दारू पिऊन मद्यपी नागरिकांना त्रास देत असल्यामुळे ही दुकाने गावाबाहेर नेण्यात यावी, अशी मागणी करीत भाजपा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी विधानसभेत उपस्थित केली होती. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या लक्षवेधीला मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरालाच हरकत घेतली. मुंबई दारूबंदी आदेशानुसार 25 मार्च 2008 च्या तरतुदीनुसार जर नगरपरिषद अथवा महापालिका क्षेत्रातील एखाद्या वॉर्डातील 25 टक्केपेक्षा कमी नसलेल्या महिला मतदार किंवा एकूण मतदार यांनी संबंधित अधीक्षकांकडे तक्रार केल्यास त्यावर मतदान घेण्यात येते. मतदानाला त्या वॉर्डातील एकूण मतदानाच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार किंवा महिला मतदारांनी दारू विक्रीच्या विरोधात मतदान केल्यास त्या परिसरात दारूबंदी केली जाते, असे लेखी उत्तर मंत्र्यांनी दिले होते. त्याला आक्षेप घेत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ही अट घटनाबाह्य आहे, असं म्हणत घटनेत कुठेही 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी उपस्थित राहावे असे नमूद नाही. अन्य कुठल्याही निवडणुकीत ही अट घातली जात नाही कारण ती घटनाबाह्य आहे, असे सांगून हा शासनाचा आदेश रद्द करावा. तो सुधारीित करण्यात यावा अशी मागणी करीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित महिलांमधील 50 टक्के महिलांनी दारूबंदीच्या विरोधात मतदान केल्यास दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. या मागणीला सर्वच पक्षांच्या आमदारांनी जोरदार पाठींबा देत ही दुरूस्ती तातडीने अथवा आजच्या आजच करावी अशी आग्रही मागणी दोन्ही बाजूनी करण्यात आली.
त्याला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्र्यांनी सांगितले की, हा आदेश तातडीने बदलता येणार नाही. त्याची कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सभागृहाच्या सर्वच सदस्यांनी केलेल्या मागणीचा विचार करून येत्या तीन महिन्यांत या शासनाच्या आदेशात बदल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.