५०० कलाकार, ४५ कलादालनांकडून ५००० कलाकृती एकाच छताखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:57 AM2020-01-10T01:57:01+5:302020-01-10T01:57:09+5:30
गुरूवारपासून ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’च्या ९ व्या पर्वाची सुरूवात झाली आहे.
मुंबई : गुरूवारपासून ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’च्या ९ व्या पर्वाची सुरूवात झाली आहे. ५०० कलाकार आणि ४५ कलादालनांकडून ५००० कलाकृतीचे प्रदर्शन घडणार आहे. यामध्ये सिंगापूर ते उत्तर पूर्व भारतापर्यंत या महोत्सवात सर्व सीमा ओलांडून सर्वोत्कृष्ट कलांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
वरळी येथील नेहरू सेंटर कला दालनात ९ ते १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ .३० वाजेपर्यंत इंडिया आर्ट फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले राहणार असून गुरूवारी या फेस्टिव्हलचा उद्घाटन समारंभ पार पडला. याप्रसंगी, उद्घाटन अभिनेता दिलीप जोशी (तारक मेहता का उलटा चष्मा) यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेता नंदीश संधू, आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झांजियानी आदींची उपस्थिती होती.
महोत्सवात ४५ कलादालनांमधील ५०० कलाकारांच्या ५००० कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. तसेच ४० शहरांमधील २५० कलाकार या महोत्सवात सहभागी आहे. तैलचित्रे, अॅक्रिलिकमधील चित्रे, जलरंगातील चित्रे इत्यादी आहेत. त्याचप्रमाणे शिल्पे आणि ओरिजिनल प्रिंट्स, निसर्गचित्रे, फिगरेटिव्हज्, अॅबस्ट्रॅक्ट चित्रे या शोमध्ये प्रामुख्याने आहेत. तसेच शहरातील दृश्ये, समुद्राचे रंग, शहरी व ग्रामीण प्रसंग, व्यक्तीचित्रे, न्यूड्स, सेमी न्यूड्स, धार्मिक कला, म्युरल्स, पारंपरिक चित्रे, पिचवाई कला, वारली कला इत्यादी कलाकृतीचा समावेश आहे. त्यामुळे हा फेस्टिव्हल कलाकार, कला शाखेचे विद्यार्थी, कला संग्राहक, कला ग्राहक, कलोपासक आणि कला रसिक सर्वांसाठीच पर्वणी ठरला आहे.
आम्ही १०० कलाकारांमधून ५०० कलाकारांपर्यंत वाढ केली आहे. प्रत्येक पाच वर्षांनी आम्ही देशाच्या इतर भागात विस्तारण्याची आशा करतो. कलाकार म्हणून आम्हाला आनंद आहे की, कोणत्याही कलाकाराने केलेल्या कोणत्याही कामाचे कौतुक केले जाते, असे इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे संचालक राजेंद्र म्हणाले.
अभिनेता दिलीप जोशी म्हणाले की, इंडिया आर्ट फेअरमध्ये विविध प्रकारची कला असते. त्यापैकी काही कलाकृती अशा आहेत की, आपण तासनतास ते पाहू शकतो. कला उपचारात्मक आहे.
>या कलाकारांचा समावेश
महेश करंबेळे, सृष्टी राव, अनुप मित्रा, अनुक्ता मुखर्जी-घोष, ओम तडकर, राव रणवीर सिंग, आनंद पांचाल, दिनकर जाधव, गणपती हेगडे, शम्पा सरकार, नैना मैथानी कुलकर्णी इत्यादींचा समावेश आहे. तसेच ज्येष्ठ कलाकार आणि संजीता अहमद, अमरजीत मान कालसी, सुबोध पोद्दार, आसावरी वाडेकर, साव्या जैन, सिम्रित लुथ्रा, गुरमीत कौर, गिरीश अदान्नावर, मिथू बसू, वंदना मेहता, अर्चना आनंद, जेल्फी अचांडी, श्वेता रस्तोगी, अजुर्मंद सुलेमानी, देवयानी पारिख, अशोक राठोड, समीर चंदा, अनुभव पवार, अश्विन कदम आणि अशा अनेकांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आहे.