लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रम अधिकाधिक बस आपल्या ताफ्यात दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच, याकामी काहीसा विलंब होताना दिसत आहे. परिणामी सध्या बसची मोठी कमतरता जाणवत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असतानाच, मार्च २०२४ पर्यंत ५०० हून अधिक बस कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे त्या भंगारात काढाव्या लागणार आहेत. दरम्यान, प्रत्यक्षात बेस्ट बसेसची संख्या कमी होत असल्याने बेस्टचे काही बसमार्ग बंद करण्याची वेळ आली आहे.
नुकताच इलेक्ट्रिक हाऊस ते वांद्रे रिक्लेमेशन बसस्थानक, ए ३६६ कुर्ला स्थानक (पूर्व) ते शिवाजी नगर टर्मिनस या बसमार्गावरील बससेवा खंडित करण्यात आली आहे. यामुळे बेस्ट प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसचा ताफा ३,३३७ कायम ठेवण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले होते. मात्र बेस्टच्या ताफ्यात असलेल्या स्वमालकीच्या बसेसचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने त्या भंगारात काढण्यात येत आहेत.
बेस्ट उपक्रमाकडून ओलेक्ट्रा या कंपनीला २,१०० बस गाड्यांची ऑर्डर देण्यात आली. याविरोधात कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड न्यायालयात गेली. जून २०२३ मध्ये याचा निर्णय लागला व न्यायालयाने ओलेक्ट्रा या कंपनीची बाजू योग्य असल्याचे निकालात म्हटले. त्यामुळे ओलेक्ट्रा कंपनीकडून बसगाड्या ताफ्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला. सप्टेंबरपासून बसेस ताफ्यात येणे अपेक्षित होते. मात्र ऑक्टोबर महिना संपायला आला तरी अद्याप एक ही बस आलेली नाही.
बेस्ट उपक्रमाला आपल्या गाड्या कालबाह्य होणार हे माहीत असताना त्याचे पूर्वनियोजन होणे आवश्यक होते. बेस्टच्या वेळकाढू धोरणामुळे फक्त सामान्य बस प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी तर अचानक बेस्ट मार्ग बंद होत असल्याने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करताना नाकीनऊ येत आहेत. बेस्ट उपक्रम चालवायचा आहे की संपवायचा, असे धोरण आहे, हे प्रशासनाने नक्की करावे.- रुपेश शेलटकर, आपली बेस्ट आपल्याचसाठी संस्था
विलंबाने प्रवाशांचे हाल
भविष्यात बेस्टला प्रवासी व महसुलावर पाणी सोडावे लागणार, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बेस्टच्या ताफ्यात लवकरच विविध कंत्राटदारांकडून २,१०० बस, ९०० दुमजली बस, २,४०० इलेक्ट्रिक बस, २५० विद्युत बस अशा एकूण साडेपाच ते सहा हजार बसेस येणार आहेत. मात्र, बसगाड्या ताफ्यात येण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
बंद झालेले बस मार्ग
- १ - इलेक्ट्रिक हाऊस ते वांद्रे रिक्लेमेशन बसस्थानक
- ए ३६६ कुर्ला स्थानक (पूर्व)/ शिवाजीनगर टर्मिनस
- ३८८ मर्यादित - कन्नमवार नगर - २ ते सांताक्रूझ बस स्थानक पूर्व
- ४२९ - घाटकोपर स्थानक पश्चिम ते मिलिंद नगर
- ५०६ मर्यादित देवनार आगार ते नेरूळ बस स्थानक
- एपीपीएस १ - मागाठाणे आगार/मीरा रोड स्थानक (पूर्व)
# १,७०४ - भाडेतत्त्वावरील गाड्या# १,२५० - स्वमालकीच्या गाड्या