५०० कोटींचा फटका; मोनो डार्लिंगचा खर्च भागवायचा कसा?; एमएमआरडीएला पडला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:03 AM2023-08-19T06:03:02+5:302023-08-19T06:05:26+5:30
अनेक वर्षांपासून तोट्यातील मोनोसारख्या पांढऱ्या हत्तीला कसे पोसायचे? असा यक्षप्रश्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोर उभा ठाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील मेट्रो आणि मोनोरेल या दोन्ही सेवा तोट्यात असून, यात वडाळा- संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल आजघडीला वर्षाला सुमारे ५०० कोटी रुपयांनी तोट्यात आहे, तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात नव्याने सुरू झालेल्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व ते डी.एन.नगर या दोन्ही मेट्रोदेखील २३ कोटी रुपयांनी तोट्यात धावत आहेत.
मोनोरेल व मेट्रो यांच्या या परिस्थितीमुळे नव्याने धावणाऱ्या मेट्रोला नफ्यात कसे आणायचे, तसेच अनेक वर्षांपासून तोट्यातील मोनोसारख्या पांढऱ्या हत्तीला कसे पोसायचे? असा यक्षप्रश्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोर उभा ठाकला आहे.
मोनोरेलचे प्रवासी वाढविण्यासाठी मेट्रो आणि लोकलची कनेक्टिव्हिटी देण्यासोबतच शेअर रिक्षा आणि टॅक्सी अशी पर्यायी वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर जोर देण्याची गरज असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.
२०१४ : पहिला टप्पा म्हणजे चेंबूर ते वडाळा हा फेब्रुवारी २०१४ साली सुरू करण्यात आला.
२०१९ : वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा मार्च २०१९ मध्ये सुरू झाला.
१० मोनोरेल
एमएमआरडीएचे माजी महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या काळात नव्याने १० मोनोरेल आणण्याबाबत काम सुरू झाले होते. मात्र, आता संजय मुखर्जी महानगर आयुक्तपदी असून, तोट्यातल्या सर्व प्रकल्पांचा अभ्यास सुरू झाला आहे.
१० मेट्रोची जबाबदारी
१० मेट्रो मार्गांची कामे वेगाने सुरू असून, सिव्हिल वर्क मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मेट्रो कामांची जबाबदारी प्रत्येकी एका अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली.
मेट्रो १ तोट्यात
वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर या मार्गावर धावणारी मेट्रो १ ही रिलायन्सकडून चालविली जात असून, ही मेट्रोही तोट्यात आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून ही मेट्रो चालविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणे अपेक्षित असल्याने याबाबत प्राधिकरणाने काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
- एमएमआरडीएने २००७-२००८ मध्ये मोनोरेल प्रकल्प आणला.
- प्रकल्प खर्च २,४०० कोटी.
- १८ मिनिटांनी १ गाडी धावते.
- दरदिवशी १४,००० प्रवासी.
- २७.५ लाखांचा प्रवास नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान
मोनोचा लेखाजोखा
वर्षे प्रवासी उत्पन्न
२०१३-१४ ७.४२ लाख ७०.२९ लाख
२०१४-१५ ५२.५६ लाख ४.१८ कोटी
२०१५-१६ ६१.६५ लाख ४.३६ कोटी
२०१६-१७ ५८.९६ लाख ४.१२ कोटी
२०१७-१८ ३३.२४ लाख २.३३ कोटी
२०१८-१९ २९.६५ लाख २.६३ कोटी
२०१९-२० ३५.८१ लाख ६.९९ कोटी
२०२०-२१ ४.६९ लाख १.३ कोटी
२०२१-२२ १२.५६ लाख २.६७ कोटी