गुंतवणुकीच्या नावाखाली ५०० कोटींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:49 AM2018-10-25T03:49:33+5:302018-10-25T03:49:36+5:30
गुंतवणुकीच्या नावाखाली जवळपास हजारहून अधिक लोकांना गंडवून ५०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संचालक नोव्हेरा शेख हिच्यासह मे. हिरा गोल्ड एक्झीम लिमिटेड, हिरा स्टील, हिरा टेक्सटाईल, हिरा फुडेक्स या कंपन्यांसह मुंबईचा मार्केटिंग एक्झ्युक्युटीव्ह सलीम अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : गुंतवणुकीच्या नावाखाली जवळपास हजारहून अधिक लोकांना गंडवून ५०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संचालक नोव्हेरा शेख हिच्यासह मे. हिरा गोल्ड एक्झीम लिमिटेड, हिरा स्टील, हिरा टेक्सटाईल, हिरा फुडेक्स या कंपन्यांसह मुंबईचा मार्केटिंग एक्झ्युक्युटीव्ह सलीम अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख ही परदेशातून या कंपन्यांच्या माध्यमातून रॅकेट चालवत होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
शेख हिने गुंतवणुकीच्या नावाखाली हिरा नावाने विविध कंपन्या उघडल्या. जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. यामध्ये तक्रारदार शान इलाही शेख यांनी २ लाखांची गुंतवणूक केली होती. पुढे त्यांना महिना २.८ ते ३.२ टक्के रकमेचा परतावा दर महिन्याला देण्याचे आमिष दाखविले होते. सुरुवातीला पैसे मिळाले. पुढे त्यांच्यावर विश्वास ठेवून १ लाख रुपये गुंतवले.
मात्र जून २०१८ पासून त्यांना पैसे देण्याचे बंद केले. त्यांनी याबाबत संबंधित कंपनीकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. अखेर शेख यांनी जे.जे. मार्ग पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, तपासात अशा प्रकारे आरोपींनी हजारो गुंतवणूकदारांकडून ५०० कोटी रुपये जमा केल्याचे उघड झाले. शान हिलाही यांच्या तक्रारीवरुन जे.जे. मार्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने ते याबाबत अधिक तपास करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाईल़ त्यानंतर आरोपींविरोधात आरोप निश्चिती केली जाईल़ आरोपींनी आरोप फेटाळल्यास याचा खटला चालेल़
>नोव्हेराला हैदराबादमध्ये अटक
ंनोव्हेरा हैदराबाद, अमेरिका, लंडन येथून या कंपन्या चालवत होती. यामागे खूप मोठी साखळी तयार झाली आहे. हैदराबादमध्ये १७ आॅक्टोबरला तिला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, मुंबईत गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.