Join us

एसटी डेपोत हाेणार मिनी थिएटर, काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 1:42 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनी घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यभरातील एसटी स्थानकांतील काँक्रिटीकरणासाठी एसटी महामंडळाला सरकार एमआयडीसीकडून ५०० कोटी रुपये दोन टप्प्यांत देईल. त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या डेपोंमध्ये सिनेमांसाठी मिनी थिएटर उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.

एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील एसटी बसस्थानकांमध्ये कॉंक्रिटीकरण पूर्ण करून बसपोर्ट ही संकल्पना राबविण्यात यावी. ग्रामीण भागात थिएटर नसल्याने त्यांना सिनेमे पाहता येत नाहीत. त्यामुळे तालुक्यांच्या ठिकाणच्या एसटी डेपोत मिनी थिएटर उभारल्यास त्यांची गैरसोय दूर होईल, त्यासाठी पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

एसटी आगार, बसस्थानकांत प्रवाशांना स्थानकांत चांगल्या सोयी-सुविधा द्या,  एसटी तोट्यात जाता कामा नये, ती नफ्यात आली पाहिजे, राज्यात एसटीची अनेक मोठी बसस्थानके आहेत. त्यांचा विकास सरकारी व खासगी भागीदारीतून करा, असे निर्देश देतानाच यामधून एसटीचाच फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हा विकास करताना एलॲण्डटी, रिलायन्स, टाटा यासारख्या मोठ्या अनुभवी कंपन्यांकडून कामे करून घ्या, असेही ते म्हणाले.

तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्र्यांकडे...

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळाला पाहिजे, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे, पण, तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांच्याशी बोलून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलून दाखवला.

परदेशी शिक्षणासाठी १० लाख रुपये देणार

एसटीचे चालक, वाहकांची आरोग्य तपासणी एसटी महामंडळाच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल. एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुले जर परदेशात शिक्षणाला जाऊ इच्छित असतील तर, यासाठी एसटी महामंडळातर्फे त्यांना बिनव्याजी १० लाख रुपये अग्रीम देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :एसटी