आंध्र प्रदेशातून मुंबईत तस्करीसाठी आणलेला ५०० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:43 AM2018-03-15T05:43:50+5:302018-03-15T05:43:50+5:30

आंध्र प्रदेशातून मुंबईत तस्करीसाठी आणलेला १ कोटी किमतीचा ५०० किलो गांजा बुधवारी अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) जप्त केला. या तस्करीप्रकरणी मामा-भाच्यासह चालकाला अटक करण्यात आली आहे.

500 kg of ganja seized for smuggling from Andhra Pradesh to Mumbai | आंध्र प्रदेशातून मुंबईत तस्करीसाठी आणलेला ५०० किलो गांजा जप्त

आंध्र प्रदेशातून मुंबईत तस्करीसाठी आणलेला ५०० किलो गांजा जप्त

Next

मुंबई : आंध्र प्रदेशातून मुंबईत तस्करीसाठी आणलेला १ कोटी किमतीचा ५०० किलो गांजा बुधवारी अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) जप्त केला. या तस्करीप्रकरणी मामा-भाच्यासह चालकाला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीपही हस्तगत करण्यात आली आहे.
मामा नंदलाल लड्डू बेलदार (५५), भाचा संजय शिवाजी मोहिते (३६), चालक काळू साहेबराव मोहिते (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबईच्या कांजूर-विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरून काही जण गांजाच्या तस्करीसाठी मुंबईत येणार असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटला मिळाली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी या ठिकाणी सापळा रचण्यात आला; आणि बोलेरो जीपचालकाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या. बोलेरोच्या झडतीत त्यांना ५०० किलो गांजा आढळून आला. यामागील मास्टरमाइंड नंदलालसह त्याचा भाचा संजय आणि चालक काळूला बेड्या ठोकण्यात आल्या. तिघांनाही न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगावचा रहिवासी असलेल्या नंदलालचा जुने मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. अशातच त्याने ड्रग्ज तस्करीत उडी घेतली. ३ ते ४ वेळा त्याने मुंबईत तस्करी केल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. मात्र तो थोडक्यात सुटला होता. या वेळी त्याने ५०० किलो गांजाच्या तस्करीसाठी मालेगावचा भाचा संजय आणि नाशिकचा चालक काळू यांची मदत घेतली. मुंबईत तो कुणाकडे हा माल देणार होता, याबाबत तो चुकीची माहिती पथकाला देत असल्याचा संशय आहे. त्यानुसार, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
>५० एकरात सुरू आहे गांजाची शेती
आंध्र प्रदेशातील ५० एकर परिसरात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीतून हा माल येत असल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. याबाबत अधिक खातरजमा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या तस्करांच्या कारवाईतून मोठे रॅकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
>गंजमपाठोपाठ व्हायझेकमधूनही होतेय तस्करी
आंध्र प्रदेश, ओडिशातील गंजम जिल्ह्यासह व्हायझेकमधूनही तस्करी होत असल्याची माहिती अटक तस्करांच्या चौकशीतून समोर येत आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 500 kg of ganja seized for smuggling from Andhra Pradesh to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.