मुंबई : ‘मनी ट्रेडिंग डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून विदेशी चलन गुंतवणुकीच्या नावाखाली ५०० जणांची फसवणूक करणारे रॅकेट गुन्हे शाखेने उघडकीस आणले. दादरमध्ये या टोळीने कॉलसेंटरच थाटले होते. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने मुंबईकरांना ६ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.कंपनीचा संचालक आणि टोळीचा म्होरक्या तन्वीर शेख (३२), त्याचे असद (२७) आणि शाहरुख (२५) हे दोन भाऊ, नोकर, व्यंकटाचलम मरिअप्पा (२८), फैयाज शेख (४०), संजय वैष्णव (२८), परवेज खान (४०), मोहम्मद जाफर शेख (२७), कंपनीचा खातेव्यवहार पाहणार, इम्रान खान (३४), आॅपरेटर अझरुद्दिन शेख (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत.तन्वीर मुख्य सूत्रधार असून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेअर्स ब्रोकर्स म्हणून तो काम करत होता. त्याचदरम्यान त्याला फोरेक्सची माहिती मिळाली. त्याचा अभ्यास करून तो या धंद्यात उतरला. त्याने आपल्या दोन भावांनाही यात सहभागी करून घेतले. या टोळीने मनी ट्रेडिंग डॉट कॉमच्या नावाने संकेतस्थळ तयार केले. याच संकेतस्थळावरून ग्राहकांकडून विदेशी चलनात गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. अशाप्रकारे तब्बल ५०० जणांची सहा कोटी ३६ लाखांची फसवणूक केली.पॉइंट पाहून ग्राहक खुशपैशांच्या मोहात मनी ट्रेडिंग डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करताच, ही टोळी त्यांच्याशी संवाद साधत असे. किमान १०० डॉलरची रक्कम गुंतवणे बंधनकारक होते. ती करताच सुरुवातीलाच ग्राहकांच्या खात्यात चांगले पॉइंट ते जमा करायचे. मात्र, पैसे जमा करत नव्हते. ट्रेडिंग खात्यात चांगले पॉइंट जमा झाल्याने हा ग्राहक आणखी पैशांच्या लालसेपोटी अधिक गुंतवणूक करायचा आणि त्यानंतर ही टोळी त्यांच्याशी संपर्क तोडत असे.
विदेशी चलन गुंतवणुकीच्या नावाखाली ५०० जणांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 2:05 AM