लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५०६ रेल्वेच्या प्रकल्पांचे व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण करण्यात येणार आहे, यात एकूण ८५ हजार कोटींच्या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच, याप्रसंगी दहा वंदे भारत ट्रेन्सनाही हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
या भेटीत राज्यासह देशात विविध ठिकाणी प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यात मुख्यतः १५० वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, १३० सोलर पॅनल, ७ ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम, ४ गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स, गुड्स शेड्स, लोको वर्कशॉप्स, १८ नवीन लाइन्स दुहेरीकरण, ३ विद्युतीकरण प्रकल्प, गेज कन्व्हर्जन, जनऔषधी केंद्र, रेल्वे कोच रेस्टॉरंट्स यांचा समावेश आहे.
१३०० जणांना रोजगार
- राज्यात लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कोच कारखान्यामुळे जवळपास १ हजार ३०० व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगार आणि १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींना अप्रत्यक्ष कंत्राटी रोजगार मिळणार आहे.
- बडोदा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉपचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या दोन प्रमुख मालवाहतूक डेपोची म्हणजेच भुसावळ आणि नागपूर वॅगनची उपलब्धता वाढणार आहे.
- या प्रकल्पामुळे १,१०० व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगारांची संधी मिळेल. याखेरीस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे पाच जन औषधी केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे चार रेल्वे कोच रेस्टॉरंटचाही शुभारंभ करण्यात येणार आहे.
- तीन नव्या विद्युतीकरण प्रकल्पामुळे कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच, इंधनाच्या खर्चातही बचत करण्यात येईल.