बँक खाते से ५०० रुपया निकालने आये साहब; पैसे क्रेडीट झाल्याच्या मेसेजमुळे बँकेसमोर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 02:19 PM2020-04-07T14:19:13+5:302020-04-07T14:20:17+5:30
सोशल डिस्टन्सिंग सांभाळताना पोलिसांना फुटला घामटा
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेअंतर्गत बँक खात्यात ५०० रुपये जमा झाल्याचा मेसेज काही नागरिकांना बुधवारी आला. त्यामुळे ते पैसे काढण्यासाठी मालवणी परिसरात असलेल्या बँकेसमोर स्थनिकांची तौबा गर्दी जमा झाली. ती पांगवताना मालवणी पोलिसांना चांगलाच घाम फुटला.
मालवणीच्या गेट क्रमांक ५ जवळ बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास या बँकेसमोर स्थनिकांची अचानक गर्दी वाढली. त्याबाबत कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षावर तक्रार केली. मात्र त्याआधीच मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गर्दी करण्याचे कारण विचारले असता बँक मे ५०० रुपया आया है, वो निकालने के लिये आये साहब' असे उत्तर देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी गर्दीचे नियोजन करत हळूहळू ती नियंत्रणामध्ये आणली. गेल्या दहा दिवसांपासून आमचे काम बंद आहे. धान्य थोडेफार पुरविले जात असले तरी अन्य लहानमोठ्या कामासाठी पैशांची गरज भासतेच. मात्र संचारबंदीमुळे कुठेच जाता येत नाही. सकाळी जनधन योजनेंतर्गत बँक खात्यात ५०० रुपये जमा झाल्याचा एसएमएस आला. त्यामुळे आम्ही बँकेमध्ये धाव घेतली, असे स्थानिकाने 'लोकमत' शी बोलताना सांगितले. 'आमच्या अखत्यारीत बँका जास्त नाहीत,मात्र गेट क्रमांक पाचजवळ झालेल्या गर्दीची माहिती मिळताच आमचे पथक त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी लोकांनी गर्दी टाळावी असे सांगत त्यांची समजूत काढत ती पंगवली' अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कालपाड यांनी दिली.