मुंबई : मुंबईतील वरळी, डिलाईल रोड, नायगाव आणि शिवडी येथील ब्रिटिशकालीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुढील सहा महिन्यांत मार्गी लावण्यात येणार असून, चाळींचा सेक्टरनिहाय पुनर्विकास करण्याचा सरकारचा विचार आहे. चाळींचा म्हाडामार्फत पुनर्विकास केल्यास चाळकऱ्यांना सुमारे ५00 चौरस फुटांचे घर मिळेल आणि म्हाडाला १५ हजार घरे उपलब्ध होतील, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी सांगितले.वायकर यांनी सोमवारी म्हाडाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबईत ९३ एकर भूखंडावर बीडीडी चाळी आहेत. वरळी येथे १२१, डिलाईल रोड ३२, नायगाव ४२ आणि शिवडी येथे १२ अशा एकूण २0७ चाळी आहेत. या चाळींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या चाळींच्या पुनर्विकासाबाबत काही वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार केला होता; परंतु हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.चाळकऱ्यांनी यापूर्वी ४७५ चौरस फुटांचे घर मिळावे अशी मागणी केली होती. परंतु आता रहिवाशांकडून ५00 चौरस फुटांचे घर द्यावे, अशी मागणी होत आहे. या परिसरात उभारण्यात आलेल्या झोपड्या अधिकृत झाल्या तरी बीडीडी चाळीतील रहिवासी अद्याप पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. चाळींचा पुनर्विकास म्हाडाने केल्यास म्हाडाला मोठ्या प्रमाणावर हाउसिंग स्टॉक उपलब्ध होणार आहे. यावर गृहनिर्माण योजना राबविल्यास सुमारे १५ हजार घरे म्हाडाला मिळणार आहेत.चाळींच्या पुनर्विकासाबाबत चाळकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही वायकर यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)म्हाडाच्या संक्रमण शिबिरांतील घरांमध्ये घुसखोरांना प्रवेश देणाऱ्या संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही वायकर या वेळी म्हणाले.
‘बीडीडी’करांना ५00 चौरस फुटांचे घर
By admin | Published: January 20, 2015 2:14 AM